अहमदनगर । ‘ठाकरे सरकार मंदिरे खुली करण्यासंबंधी एवढा हट्टीपणा का करते, हेच कळत नसून, या हट्टी सरकारला आता साईबाबांनीच सदबुध्दी द्यावी. ’ असं वक्तव्य माजी मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. प्रवरानगर येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. ‘मंदिरे उघडण्यासाठी झालेल्या आंदोलनांतील भाविकांच्या भावानांचा नसेल तर किमान मंदिरांवर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्थेचा विचार करून तरी राज्य सकारने मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतला पाहिजे’ असं पाटील यांनी म्हटलं आहे.
राज्यातील प्रमुख धर्माचार्य, विविध संप्रदायांचे साधु-संत, अनेक धार्मिक व आध्यात्मिक संघटना यांच्यातर्फे १३ ऑक्टोबर रोजी मंदिरे सुरू करण्याच्या मागणीसाठी राज्यव्यापी लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. याला पाठिंबा देण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. त्यासंबंधी विखे पाटील यांनी भूमिका मांडली.
‘अर्थ व्यवस्था सावरण्यासाठी सरकारने अन्य व्यवहार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, मंदिरे उघडण्यासाठी अनेकदा मागण्या आणि आंदोलने होऊनही याची दखल घेतली जात नाही. या हट्टी सरकारला आता साईबाबांनीच सदबुध्दी द्यावी. मोठी मंदिरे असलेल्या गावातील अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. याचे गांभीर्य सरकारने लक्षात घेण्याची गरज आहे,’ असेही विखे पाटील म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”