हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नुकतंच भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मासह पाच क्रीडापटूंना यावर्षीचा मानाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. याशिवाय, वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि महिला क्रिकेटपटू दिप्ती शर्मा या दोन क्रिकेटपटूंना अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आला. यावर्षी पुरस्कार यादीत पाच क्रीडापटूंना खेलरत्न पुरस्कार, २७ क्रीडापटूंना अर्जुन पुरस्कार, १३ प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार, १५ खेळाडूंना ध्यानचंद पुरस्कार तर आठ खेळाडूंना तेनसिंग पुरस्कार घोषित झाले. परंतु अर्जुन पुरस्काराच्या यादीत आपले नाव नसल्याने रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिक हिने नाराजी व्यक्त केली आणि पंतप्रधान मोदी यांना थेट सवाल केला.
https://twitter.com/SakshiMalik/status/1297022410982477826?s=20
“माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्रीडा मंत्री किरेन रिजीजू, 2016 मध्ये मला खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. या सन्मानाचा मला अभिमान आहे. क्रीडाविश्वाशी निगडीत सर्व पुरस्कार जिंकावेत असं प्रत्येक क्रीडापटूचं स्वप्न असतं. त्यासाठी खेळाडू आपलं सर्वस्व पणाला लावतात. माझंही स्वप्न आहे की मला अर्जुन पुरस्कार मिळावा. यासाठी मी असं कोणतं पदक जिंकून आणू जेणेकरून मला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल? की माझ्या नशिबात हा पुरस्कारच नाहीये?”, असा सवाल तिने आपल्या ट्विटच्या माध्यमातून थेट पंतप्रधान मोदी यांना विचारला.
खेलरत्न पुरस्कार विजेत्या साक्षी मलिक आणि मीराबाई चानू यांना अर्जुन पुरस्कार देता येणार नाही, असा निर्णय यापूर्वीच केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने घेतला. गेल्या आठवड्यात निवृत्त न्यायमूर्ती मुकुंद शर्मा यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने २९ जणांची अर्जुन पुरस्कारासाठी क्रीडा मंत्रालयाकडे शिफारस केली होती.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’