सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी; गाडी उडवणार असल्याचा मेसेज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बॉलिवूडमधील सुपरस्टार सलमान खान पुन्हा एकदा अज्ञात धमक्यांच्या सावटाखाली आला आहे. यापूर्वी देखील लॉरेन्स बोष्णोई गॅन्ग कडून सलमान खानला जीवे मारण्याच्या धमकीमुळे देशभरात खळबळ माजली होती. सलमानचे निकटवर्तीय बाबा सिद्दीकी यांची हत्या केल्यानंतर या धमक्या सलमान खानला आल्यामुळे पोलिसांसह अभिनेता सतर्क होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा सलमान खानला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

व्हॉट्सअॅप वरील संदेशामुळे खळबळ

मुंबईतील वरळी वाहतूक विभागाच्या अधिकृत व्हॉट्सअॅप क्रमांकावर आलेल्या एका संदेशामुळे खळबळ माजली आहे. या मेसेजमध्ये सलमानची गाडी बॉम्बनं उडवून टाकण्याचा तसेच त्याला थेट घरात घुसून ठार मारण्याचा इशारा दिला आहे.

सध्या सलमान खान उच्चस्तरीय सुरक्षा कवचात वावरत असून, त्याच्या घराभोवतीही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे वांद्र्यातील ‘गॅलेक्सी’ अपार्टमेंटमधील त्यांच्या निवासस्थानी आता बुलेटप्रूफ काचांचाही वापर करण्यात आलेला आहे.

काळवीट शिकार प्रकरणानंतर सलमान खानला बिष्णोई गँगकडून वारंवार धमक्या येत आहेत. काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची भर रस्त्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. ही जबाबदारी देखील बिष्णोई टोळीने स्वीकारल्याचं समोर आलं होतं. बाबा सिद्दीकी आणि बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांचे जवळचे संबंध होते, त्यामुळे या घटनेनंतर संपूर्ण इंडस्ट्री हादरली होती.

या पार्श्वभूमीवर सलमानला मिळालेल्या नव्या धमकीने पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू करण्यात आला आहे.