टीम हॅलो महाराष्ट्र । आज के शिवाजी नरेंद्र मोदी पुस्तकावरून सुरू झालेल्या वादावर भूमिका मांडताना भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर टीका केली होती. शिवसेनवर टीका करताना चंद्रकांत पाटील यांनी वीर सावरकरांच्या बदनामीचा प्रश्न उपस्थित केला होता. शिवरायांच्या बदनामीवर जे चिडले ते वीर सावरकरांच्या बदनामीवर का भडकले नाहीत? अशी विचारणा पाटलांनी केली होती. तर शरद पवार यांना लक्ष करत पवारांना जाणता राजा कसे म्हणता? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. दरम्यान शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तकाच्या वादाला पूर्णविराम दिला. त्याचवेळी भाजपावर टीका करण्याची संधी साधली आहे. विशेष म्हणजे पाटील आणि मुनगंवार या दोघां भाजप नेत्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचा खरपूस समाचार सामनाच्या अग्रलेखात घेण्यात आला आहे.
शिवरायांच्या बदनामीवर जे चिडले ते वीर सावरकरांच्या बदनामीवर का भडकले नाहीत? हा चंद्रकांत पाटलांचा यांचा प्रश्न निरर्थक आहे. शिवसेनेने सावरकरांच्या संदर्भात ठाम भूमिका नेहमीच घेतली. नव्हे, फक्त शिवसेनेनेच घेतली. केंद्रात भाजपचे सरकार आहे. वीर सावरकरांना तत्काळ ‘भारतरत्न’ द्यावे, राष्ट्रपुरुषांच्या नामावलीत वीर सावरकरांना समाविष्ट करावे व वीर सावरकरांवर जो घाणेरडे विधान करील त्यावर खटले दाखल करण्याचे फर्मान केंद्रीय गृह मंत्रालयाने काढावे. हे करणार आहात का? अशी विचारणा करत शिवसेनेनं पाटील यांना चांगलाच धारेवर धरलं.
शिवसेनेने पहिली तोफ चंद्रकांत पाटील यांच्यावर डागल्यानंतर आपला मोर्चा मुनगंटीवार यांच्याकडे वळविला. छत्रपती शिवाजी महाराज जाणते राजे होते. मग शरद पवारांना जाणता राजा कसे म्हणता असं भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं होतं. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच हा प्रश्न विचारण्याचा सल्ला शिवसेनेनं मुनगंटीवार यांना दिला आहे. “सुधीर मुनगंटीवार यांनी एक बाळबोध प्रश्न विचारला आहे, ‘पवारांना जाणता राजा कसे म्हणता?’ हा प्रश्न त्यांनी श्री. नरेंद्र मोदी यांनाच विचारायला हवा. छत्रपती शिवरायांना ‘रयतेचा राजा’ असे संबोधले जात असे. जनतेच्या प्रश्नांबाबत व भावनांबाबत इतंभूत माहिती असलेला लोकनेता म्हणजे ‘जाणता राजा’ हे पवारांच्या बाबतीत नरेंद्र मोदी यांनीच मान्य केले. त्यामुळे मुनगंटीवार यांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मोदीच देतील. पवार जाणता राजा कसे? असा प्रश्न उभा केल्याने आज के शिवाजी : नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून भडकलेल्या वादाची आग कमी होणार नाही. मधल्या काळात भाजपच्या काही नेत्यांच्या मागेही ‘जाणते राजे’ अशा उपाध्या हौसेने लावण्यात आल्या. पण कुठे शिवाजी राजे व कुठे हे सर्व हवशे नवशे गवशे!,” अशी बोचरी टीका शिवसेनेनं केली आहे.