औरंगाबाद : संपूर्ण महाराष्ट्रभर ठिकठिकाणी संभाजी ब्रिगेडच्यावतीने आज ‘आमदार घेराव’ आंदोलन करण्यात आले. औरंगाबाद येथील आमदार अंबादास दानवे यांच्या क्रांती चौक येथील कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आ. दानवे यांना घेराव घालत हे आंदोलन करण्यात आले.
मराठा समाजाचे ओबीसीकरण व ओबीसी आरक्षणाचे संरक्षण करावे, सुप्रीम कोर्टाच्या निकाला पूर्वीच्या मराठा समाजातील नोकरीस पात्र उमेदवारांच्या रखडलेल्या नियुक्त्या तात्काळ कराव्यात, मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क तात्काळ माफ करावे, सर्व समाज घटकांची जातनिहाय जनगणना करावी. या चार प्रमुख मागण्यांसाठी आम्ही आंदोलन करत आहोत अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड यांनी दिली. या मागण्यांसंदर्भात आ. दानवे यांना निवेदन देण्यात आले.
तेव्हा येणाऱ्या 4 व 5 विधिमंडळ अधिवेशनात मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या पूर्ण ताकदीनिशी विधिमंडळात मांडतो अशी ग्वाही आ. दानवे यांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना दिली.या आंदोलनास रमेश गायकवाड, योगेश थोरात, वैशालीताई खोपडे, रेणुका सोमवंशी, तुषार जाधव, राहुल भोसले, रामेश्वर कोतले आदींची उपस्थिती होती.