सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
शिवसेना खासदार संजय राऊत यांना काल ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. त्यानंतर ईडीच्या कार्यालयाकडे जात असताना राऊतांनी आपल्या शैलीत घराबाहेर येऊन हात हलवून, गमच्छा दाखवून चौकशीला सामोरे जात असल्याचे सांगितले. यावरून आमदार तथा माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. “राऊत हे एखाद्या युद्धाला निघाले असल्यासारखे निघाले होते. हात हलवून, गमच्छा दाखवून राऊत यांनी नौटंकी आणि उसने अवसान आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या हेकेखोर स्वभावामुळेच शिवसेना संपली आहे, अशी देसाई यांनी केली आहे.
आ. देसाई यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, काल जी ईडीने अटकेची कारवाई केली त्यानंतर राऊत हे एखाद्या युद्धाला निघाले असल्यासारखे ईडीच्या कार्यालयाकडे गेले. एका गैव्यवहार प्रकरणी आपल्याला अटक झाली आहे हे ते विसरले होते. ईडीने केलेल्या कारवाईचा राऊत कांगावा करत आहेत. काहीही झाले तरी मी शिवसेना सोडणार नाही, असे राऊत म्हणत आहेत. खरं तर त्यांनीच शिवसेना संपवली आहे.
खरं तर राऊतांवर पुरावे घेऊनच कारवाई झाली आहे. ईडी हि स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे त्यांच्या कामात कोणाचाच हस्तक्षेप नसतो. संजय राऊत यांना कर नाही तर डर कशाला. कारवाई झाल्यावर सगळेच म्हणतात अडकवलं गेलं आहे. असं म्हणनं हे चुकीचं आहे. राऊतांचे भाऊ चुकीचं बोलत आहेत. ते जर बोलतच असतील तर त्यांनी राऊतांवर होत असलेली कारवाई कशी चुकीची आहे हे अधिकाऱ्यांना पटवून ध्यावे, मग अधिकारी तपास करतील. राऊतांवर झालेल्या कारवाईत भाजपचा हात नाही, असे देसाई यांनी म्हंटले.