कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कोरोनाग्रस्त महिलेला रुग्णालयात पायी चालत नेल्याचा धक्कादायक प्रकार कराड येथे गुरुवारी दुपारी घडला. सदर घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर समाजाच्या अनेक स्तरांतून यावर तीव्र शब्दांत प्रतिक्रिया प्राप्त झाल्या. आता राज्याचे गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी यावर आपले मत व्यक्त केले आहे. याबाबत कोण दोषी आहे याबाबत शोध घेण्याच्या सूचना आपण अधिकाऱ्यांना दिल्या असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल अशी माहिती देसाई यांनी दिली आहे.
कोरोनाबाधित रुग्णांना दवाखान्यापर्यंत नेण्या आणण्यासाठी शासनाकडून रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात येते. मात्र कराड येथील सदर महिलेला रुग्णवाहिका का उपलब्ध झाली नाही याबाबत प्रांत अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जाणार आहे. रुग्णवाहिका उपलब्ध असूनही ती पुरवण्यात आली नाही का? कोणामुळे वाहन उपलब्ध झाले नाही? याबाबत आपण सखोल चौकशी करणार आहोत असंही देसाई यांनी यावेळी सांगितले. तसेच सदर प्रकरणामध्ये जे कोणी दोषी आढळेल त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल आणि यापुढे असा प्रकार कोठेही होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल असे देसाई यांनी सांगितले आहे.
दरम्यान, सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून आज दिवसभरात जिल्ह्यात तब्बल २२ नवे कोरोना रुग्ण सोडले आहेत. सातारा जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ११४ वर पोहोचली असून कराड तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या ८५ वर पोहोचली आहे.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/2852157018200925/
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/239608223778118/