कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
काही पोलीस अधिकारी महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याच्या प्रयत्नात असल्याचं धक्कादायक वक्तव्य राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं होतं. पोलीस दलातील चार ते पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महाविकासआघाडी सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले. यामध्ये एका अतिवरिष्ठ महिला अधिकाऱ्याचाही समावेश होता. अस देशमुख म्हणाले होते. यावर आता राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी आपले मत व्यक्त केले आहे. आपण याबाबत गृहमंत्र्यांशी लवकरच चर्चा करणार असल्याचं देसाई यांनी सांगितले.
यासंदर्भात राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना विचारलं असता ते म्हणाले, “मलाही याबाबतचं वृत्त हे प्रसिद्धी माध्यमाकडूनच समजलं आहे. पण अनिल देशमुख साहेबांकडे काहीतरी याबाबत माहिती असेल. त्या माहितीच्या अनुषंगाने त्यांनी हे विधान केले आहे. माझ्या कामाच्या व्यापातून मोकळा झाल्यानंतर आज रात्री मी अनिल देशमुखांशी यावर चर्चा करणार आहे. पण महाविकास आघाडीतील एक मंत्री या नात्याने मी सर्वाना सांगू इच्छितो की महाविकास आघाडीचे सरकार एका भक्कम विचाराने उभं राहिलं आहे.
तिन्ही पक्षाने एकमेकांना पाठींबा दिला आहे, नेतृत्व शिवसेना करत असली तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भक्कम पाठिंबा दिला आहे. उद्धव ठाकरेंच नेतृत्व सर्वांनी मान्य केलं आहे. त्यामुळे सरकार पाडण्याचा कोणीही कितीही प्रयत्न केला तरी तो प्रयत्न यशस्वी होणार नाही. हे सरकार 5 वर्ष नक्की टिकेल असा 100 टक्के आम्हाला विश्वास आहे. आणि फक्त 5 वर्षच नव्हे तर पुढची 10 वर्ष ही महाविकास आघाडी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करेल. त्यामुळे ज्यांना कोणी हे सरकार पाडायचं आहे त्यांनी आपला वेळ फुकट व्यर्थ घालवू नये, असा टोला शंभुराज देसाई यांनी लगावला आहे.
ते पुढे म्हणाले की, आत्ता आमचं सरकार हे फक्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काम करत आहे. उद्धव ठाकरे यांनी पहिल्या दिवसापासून सर्वाना सांगितलं आहे की इतर कोणत्या गोष्टी पेक्षा कोरोनाचा संसर्ग करण्यासाठी आणि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जास्त प्राधान्य काम करा.त्यामुळे आमचं प्राधान्य हे कोरोनाला परतवण्यासाठीच आहे.विरोधी पक्षाने कितीही आदळआपट केली तरी त्याचा कोणताही परिणाम महाविकास आघाडी वर होणार नाही.
पोलिसांची नावं जाहीर करणार का या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले,” गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी बोलल्याशिवाय या मुद्द्यावर वक्तव्य करणं उचित ठरणार नाही.परंतु त्यांच्या कडे यासंबंधी काही महिती असेल तर ते याबाबत निर्णय घेतील.अस मंत्री शंभूराज देसाई म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’