नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख
लोकसभा निवडणूक प्रचाराला आता अवघा आठवडा शिल्लक राहिला असून, उमेदवारांनी वैयक्तिक भेटीगाठींऐवजी प्रचार रॅलींवर भर देण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे समीर भुजबळ, शिवसेनेचे गोडसे, अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पवन पवार यांनी विजयासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
शनिवार आणि रविवार सुटी असल्याने शहरातील मतदार घरीच असतात. याचा फायदा उचलण्यासाठी राष्ट्रवादीचे भुजबळ आणि शिवसेनेच्या गोडसेंनी शहरात प्रचार रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. हेमंत गोडसे यांनी देवळाली मतदारसंघात आणि सिडको भागात रॅली काढली. सिडकोत आमदार सीमा हिरे यांच्यासह गोडसेंनी मोटारसायकल रॅली काढून गल्लीबोळात जाऊन मतदारांशी संपर्क साधला. याच वेळी राष्ट्रवादीचे उमेदवार भुजबळ यांनीही सिडकोतच रॅली काढत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.
विशेष म्हणजे दोन्ही उमेदवार सिडकोतील मतदारांना आवाहन करत असताना एकमेकांसमोर आले. यावेळी दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांनी एकमेकांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. परंतु, उमेदवारांनी मात्र ही भेट खिलाडू वृत्तीने घेत, एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी हेमंत गोडसेंनी विजयाची खूण दाखवली, तर समीर भुजबळांनी हात दाखवत आपल्याला मतदान करण्याचे आवाहन हेमंत गोडसेंसह समर्थकांना केले.