हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सतत होणाऱ्या अपघाताच्या घटनांमुळे समृद्धी महामार्ग नेहमी चर्चेत राहिला आहे. परंतु पुढील दोन दिवस या मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. कारण, समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रिड ट्रान्समिशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानची वाहतूक सेवा 28 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर असे दोन दिवस 12 ते 4 वेळेत बंद असेल.
परंतु उर्वरित काळामध्ये मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू राहिल. याबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता व प्रकल्प संचालक रामदास खलसे यांनी दिली आहे. मुख्य म्हणजे, दोन दिवस उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम सुरू असल्यामुळे प्रवाशांना वाहतुकीसाठी दुसरा मार्ग वापरावा लागणार आहे. रस्ते कामानिमित्त 12 ते 4 वेळेत जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान समृद्धी महामार्ग बंद राहणार आहे. त्यामुळे या काळात दुसरा कोणता पर्यायी मार्ग निवडावा याबाबतची माहिती पुढे देण्यात आली आहे.
पर्यायी मार्ग कोणता
– नागपूरकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक निधोना इंटरचेंज आयसी-14 मधून बाहेर पडेल. पुढे निधोना एमआयडीसी मार्गे- राष्ट्रीय महामार्ग 753 अ मार्गे केंब्रीज शाळेपर्यंत उजवीकडे वळून सावंगी बायपास मार्गे सावंगी इंटरचेंज क्रमांक आयसी-१६ (छत्रपती संभाजीनगर) येथे समृद्धी महामार्गावर प्रवेश करून शिर्डीकडे रवाना होईल.
– तसेच, समृद्धी महामार्गावरून शिर्डीकडून नागपूरकडे जाणारी वाहतूक, सावंगी इंटरचेंज क्र. आयसी-१६ येथून बाहेर पडून वर दिलेल्या मार्गावरून (विरुद्ध दिशेने) निधोना (जालना) इंटरचेंज क्र. आयसी-१४ या ठिकाणी समृद्धी महामार्गावर प्रवेश करून नागपूर दिशेने रवाना होईल. इतर काळात वाहतूक पूर्ववत राहील.