हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Samruddhi Mahamarg । मुंबई – नागपूर समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाला असून यामुळे विदर्भ मराठवाड्यातील प्रवाशांना मुंबईला येन अगदी सोप्प आणि आरामदायी झालं आहे. आता उत्तर महाराष्ट्रातील एक जिल्हा या समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे. हा जिल्हा म्हणजे जळगाव… होय, अतिशय महत्वाचा जिल्हा असलेला जळगाव जिल्हा समृद्धी महामार्गला जोडण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता जळगाव ते मुंबई हे अंतर अवघ्या ५ तासांत पार करता येणार आहे. हा मार्ग कुठून आणि कसा जोडला जाईल? याची माहिती जाणून घेऊयात..
तर जळगाव ते नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाशी (Samruddhi Mahamarg) जोडण्याचा महत्वाचा निर्णय रविवारी नागपूर येथे पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, खासदार स्मिता वाघ, आमदार देवयानी फरांदे, आमदार मंगेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.या बैठकीत जळगाव ते समृद्धी महामार्ग जोडणीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकल्पास तात्काळ पुढील कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश दिले असून, येत्या काळात प्रकल्पावर प्रत्यक्ष काम सुरू होण्याची शक्यता आहे.
५ तासांतच जळगावकरांना मुंबई गाठता येणार – Samruddhi Mahamarg
सध्या जळगावहून अजिंठा, सिल्लोडमार्गे छत्रपती संभाजीनगरला पोहोचता येते. यासाठी दोन ते अडीच तास लागतात. आता हाच रस्ता समृद्धी महामार्गाशी जोडला जाणार आहे. त्यामुळे अडीच तासांचा प्रवास १ तासावर येणार आहे. म्हणजेच काय तर जळगाव वरून छत्रपती संभाजीनगरला पोहोचन्यासाठी १ तास आणि पुढे छत्रपती संभाजीनगरला ते मुंबई ४ तास अशा एकूण ५ तासांतच जळगावकरांना मुंबई गाठता येणार आहे. दुसरीकडे, जळगाव धुळे, नाशिकमार्गे मुंबईला जाण्यासाठी महामार्ग आहे. मात्र त्या महामार्गावरुन जाण्यासाठी ८ तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. अशावेळेस जळगावहून छत्रपती संभाजीमार्गे समृद्धी महामार्गावरुन वाहतूक सुरू झाल्यास मुंबईत फक्त 5 तासांत पोहोचता येणार आहे. जळगाव ते छत्रपती संभाजीनगर तसेच चाळीसगाव ते कन्नड दरम्यानची वाहतूक अधिक सुलभ आणि गतिमान होणार आहे. जळगावकरांना याचा मोठा फायदा होणार असून आरामात मुंबईला जाता येणार आहे.