सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश केला असून त्यांच्याकडून चोरीचा २ लाख १३ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सादर आरोपींच्यावर कुपवाड, संजयनगर, विश्रामबाग पोलीस ठाण्यात चोरी, घरफोडी, जबरी चोरी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांनी कुपवाड येथील गोमटेश नगर मध्ये घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक विविध ठिकाणी पेट्रोलिंग करीत असताना पथकातील बिरोबा नरळे याना त्यांच्या खास बातमीदाराकडून भारत सूतगिरणी ते शमनगर व पुढे मिरज जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावर २ तरुण पैशाच्या देण्याघेण्याच्या कारणावरून एकमेकांना शिवीगाळ करीत सॅक घेऊन थांबले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने दुपारी पावणेदोन वाजण्याच्या दरम्यान छापा टाकत श्रेयश कवठेकर आणि दत्तात्रय ऐवळे या दोघा सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे पथकाने कसून चौकशी केली असता, त्यांनी घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यांच्या जवळ असणाऱ्या सॅकची तपासणी पोलिसांनी केली असता त्यामध्ये सोन्याचे नेकलेस, लक्ष्मी हार, पोत, टिकमाळ, अंगठी, कानातील टॉप्स, बदाम, चांदीचे पैंजण, लक्ष्मी नाणे, लहान मोठ्या मण्यांसह डेल आणि एचपी कंपनीचे दोन लॅपटॉप, लिनोव्हो कंपनीचा टॅब असा मुद्देमाल आढळून आला.
त्यांच्याकडून एकूण २ लाख १३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता दोघांनी एका साथीदाराच्या मदतीने दिनांक ११ मे रोजी कुपवाड येथील गोमटेश नगर येथील विजय कोळी यांच्या बंगल्यामध्ये घरफोडी केल्याची कबुली दिली. पथकाने त्यांना ताब्यात घेऊन अधिक तपासासाठी कुपवाड पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने केली आहे.