बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर विधानसभा मतदारसंघात विखे पाटील पराभवाचा वचपा काढणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नगरच्या राजकारणातील दोन बडे प्रस्थ… एक विखे पाटील तर दुसरे बाळासाहेब थोरात… नगरमध्ये विखे पाटलांच्या वर्चस्वाच्या राजकारणाला बाळासाहेब थोरात संगमनेर मधून आव्हान देतात… त्यामुळे संगमनेर हा जिल्ह्याच्या राजकारणातील सत्ता संतुलन करणारा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो… अनेकांनी प्रयत्न करून पाहिले… लढत दिली… पण संगमनेरमध्ये सलग आठ टर्म निवडून जात थोरातांनी विरोधकांना नावापुरतं देखील शिल्लक ठेवलं नाही… पण नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेला सुजय विखेंचा पराभव झाल्यानंतर आपल्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी त्यांनी आपला मोर्चा वळवलाय तो थोरातांच्या संगमनेरकडे… त्यामुळे एकमेकांच्या राजकारणात फारशी ढवळाढवळ न करणारे विखे विरुद्ध थोरात आगामी विधानसभा निवडणुकीत संगमनेरच्या जागेवरून एकमेकांना भिडण्याचे चान्सेस वाढलेत… त्यात बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांचा मतदारसंघातील वाढलेला वावर पाहता यंदा विखे आणि थोरात कुटुंबाची तिसरी पिढी देखील संगमनेर मध्ये एकमेकांच्या विरोधात लढत देऊ शकते… त्यामुळे संगमनेरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवून राज्याच्या राजकारणात प्रभाव पाडणाऱ्या थोरात यांचा मतदारसंघच यंदा धोक्यात आहे का? सुजय विखे पाटील लोकसभेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी स्वतः मैदानात उतरतील की विरोधी उमेदवाराच्या पाठीशी ताकद उभी करतील? संगमनेरचा 2024 चा आमदार नेमका कोण होतोय? त्याचाच हा स्पेशल रिपोर्ट…

अगदी मोदी लाट असूद्या किंवा लोकसभेला विरोधी बाजूनं लीड… विधानसभेला मात्र संगमनेरमध्ये फक्त आणि फक्त थोरात पॅटर्नच चालतो… तब्बल 40 वर्ष प्रतिनिधित्व करूनही प्रत्येक विधानसभा निवडणुकीत थोरातांचं लीड कमी होण्याचे ऐवजी नेहमी वाढतच गेलं… अगदी मोदी लाट असतानाही 2014 ला तब्बल 60 हजारांचं लीड घेतलं होतं तर 2019 ला याच थोरातांनी नवा इतिहास रचत तब्बल 64 टक्के मतं पारड्यात घेत दणक्यात विजय मिळवला होता… शिवसेनेच्या साहेबराव नवले यांचा या निवडणुकीत दारून पराभव झाला… खरंतर 2019 लाच विखे पाटील पिता पुत्रांनी भाजपची वाट धरल्यानंतर विखेंनी थोरातांचा बालेकिल्ला पोखरण्याचं काम केलं होतं… शालिनीताई विखे पाटील यांना संगमनेरमधून भाजपच्या तिकिटावर उभी करण्याची खेळी विखेंनी केली देखील होती… जनसंपर्क कार्यालय तयार होऊन शालिनीताईंच्या प्रचाराला धारही आली होती… मात्र शिवसेनेने उमेदवारीसाठी आग्रह धरल्याने विखे पाटलांचा नाईलाज झाला… आणि त्यांनी दोन पावलं मागे घेत शिवसेनेला निवडणूक लढवू दिली…

Balasaheb Thorat यांच्या संगमनेरमध्ये Vikhe-Patil पराभवाचा वचपा काढणार | Sangamner Vidhan Sabha

पण आता नगरच्या लोकसभेत झटका बसल्यानंतर सुजय विखेंनी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे… त्यात त्यांचा सर्वाधिक भर संगमनेर मतदारसंघाकडे असल्याने इथं सुजय विखे विरुद्ध बाळासाहेब थोरात किंवा सुजय विखे विरुद्ध जयश्री थोरात अशी अटीतटीची लढत होऊ शकते… विखे पाटलांचा नगरच्या राजकारणावर दबदबा असला तरी थोरातांच्या संगमनेरमधील वर्चस्वाला आव्हान देणं, वाटतं तितकं सोपं नक्कीच नाहीय… संगमनेर मधल्या सहकाराच्या, संस्थात्मक उभारणीच्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक नाड्या या झाडून थोरातांच्याच हातात आहेत… तालुक्यातील पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि अनेक ग्रामपंचायती तसंच स्थानिक संस्थांवर थोरातांचं वर्चस्व आहे… संगमनेर शहराला निळवंडे धरणातून केलेली पिण्याच्या पाण्याची थेट पाईप लाईन, शहरातील सर्वंच सहकारी संस्थांचा आदर्श आणि स्वच्छ कारभार, कार्यकर्त्यांची मजबूत फळी या बाळासाहेबांसाठी जमेच्या बाजू ठरतात… यासोबतच अमृतवाहिनी हॉस्पिटल, मेडिकल-फार्मसी कॉलेज, इंजिनीयरिंग कॉलेज आदींच्या माध्यमातून त्यांच्या अनेक लोकोपयोगी कार्यक्रम चालवले जातात. मतदारांना बांधून ठेवण्यात अमृतवाहिनी उपक्रमाचा वाटाही मोठा असतो….

अर्थात हे सगळं वन लाईन मध्ये पाहिलं तर थोरात हे आपल्या विरोधकांपेक्षा दस पटीने अधिक सरस ठरतात… पण प्रश्न जेव्हा थोरात विरुद्ध विखे पाटील असा येतो तेव्हा त्यांच्यातील संघर्षाचा इतिहासच बरच काही सांगून जातो… सुरुवातीला एकाच पक्षात असूनही विखे आणि थोरात यांच्यातला सुप्त संघर्ष सुरूच होता… पण दोघांनीही एकमेकांच्या प्रभावक्षेत्रात कधीच ढवळढवळ केली नाही… मात्र सुजय विखेंच्या पराभवात थोरातांनी मोठी ताकद लावली होती… अशी चर्चा दबक्या आवाजात होत असते… म्हणूनच आपल्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी सुजय विखे यांनी आता थेट संगमनेर विधानसभा मतदारसंघातून आमदारकी लढवण्याची इच्छा बोलून दाखवलीय… या सगळ्यात बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरातही मतदारसंघात ऍक्टिव्ह झाल्या आहेत… संगमनेर युवा काँग्रेसचा पदभार यासोबतच मतदार संघातील त्यांचा वावर वाढल्याचही सध्या पाहायला मिळतय…त्यामुळे तब्बल चाळीस वर्षांच्या वर्चस्वानंतर बाळासाहेब थोरात आपला राजकीय वारसा पुढच्या पिढीकडे सुपूर्त करतील का? ते पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे…

थोरात यांनी राज्य मंत्रिमंडळात जलसंधारण, शिक्षण, कृषी, महसूलसारखी महत्त्वाची खाती भूषवली. त्यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठीही घेतलं जात होतं. त्यांचं पक्षात वेगळं स्थान आहे. संगमनेर थोरात यांच्या विरोधकांत कधीच एकवाक्यता राहिलेली नाही. त्याचा फायदा थोरातांना सातत्यानं मिळाला. इतर ठिकाणी घराणेशाहीविषयी लोकांच्या मनात तिडीक असते; परंतु संगमनेरमध्ये ती दिसत नाही. त्याचं कारण घराणेशाही असली, तरी थोरात यांची नातेवाइक मंडळी लोकशाही पद्धतीनं निवडून येत असतात. त्यांचं काम चोख असतं. त्यामुळं तर त्यांच्यावर जनता वारंवार विश्वास टाकते…. पण हेच सेट झालेलं पॉलिटिकल नरेटीव खोडून काढण्याची जणू शपथच विखे पाटील पिता पुत्रांनी घेतलीय… लोकसभेला थोरातांना मिळालेलं मायनस मधील लीड पाहता विधानसभा निवडणुकीत इथं विखे विरुद्ध थोरात अशीच लढत होईल, असं चित्र सध्यातरी दिसतंय… मात्र शिवसेना शिंदे गटाने हट्ट धरलाच तर 2019 सारखीच संगमनेरची आमदारकी कॉम्प्रमाईज करायची का? असा मोठा पेच विखेंपुढे असणार आहे…

महाविकास आघाडीच्या बाजूने असणारे वातावरण, थोरातांची सहकार – संस्थात्मक जाळ आणि राज्याच्या राजकारणावरची पकड हे सगळं पाहता इथं महायुतीला बाळासाहेब थोरातांच्या विजयाचा वारू अडवण, वाटतो तितका सोपा नाही… बाकी तुम्हाला काय वाटतं? विखे विरुद्ध थोरात या संघर्षाच्या दुसऱ्या अंकाची ठिणगी संगमनेरच्या विधानसभेला पडणार का? संगमनेरच्या विधानसभेला विखे विरुद्ध थोरात यांच्यातील दुसरी की तिसरी पिढी एकमेकांना लढत देईल? शिवसेनेने उमेदवारीसाठी हट्ट धरलाच तर विखे पाटील पिता-पुत्रांची भूमिका नेमकी काय राहील? या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? संगमनेर विधानसभा मतदारसंघाचा पुढचा आमदार कोण? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा…