प्रथमेश गोंधळे । सांगली प्रतिनिधी
कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव सागर खोत यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या सांगली जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी निवड झाली आहे. युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टीळेकर यांनी ही निवड केली आहे. रयत क्रांती शेतकरी संघटनेचे सागर खोत यांची थेट भाजपच्या युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे हे सदाभाऊ खोत यांच्या इस्लामपूरातील उमेदवारीचे संकेत असल्याचे समोर येत आहे.
भाजपच्या कमळ चिन्हावरच सदाभाऊ लढतील, अशी चिन्हे आहेत. दरम्यान भाजपमधून वंचित आघाडीत गेलेले गोपीचंद पडळकर हे पूर्वी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष होते. भारतीय जनता पार्टीचे राज्याचे नूतन प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील व युवा मोर्चाचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळी कृषी, पणन व पाणीपुरवठा राज्यमंत्री नामदार सदाभाऊ खोत, भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष आमदार पृथ्वीराज देशमुख, भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, वाळवा पंचायत समितीचे विरोधी गटनेते राहुल महाडीक, सांगली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पै. भिमराव माने, शशिकांत शेळके, अभिषेक भांबुरे आदी उपस्थित होते. ग्रामीण भागातील संघटन व कौशल्यामुळे भारतीय जनता पक्षाने त्यांना ही नवी संधी दिली आहे. त्यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. तालुक्यातील व जिल्ह्यातील तरुणांच्या विविध प्रश्र्नांची त्यांना जाण आहे. त्यामुळेच त्यांना ही संधी मिळाली.