सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोधळे
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचार्यांच्या डोळ्यात चटणी टाकून शुक्रवारी चार अज्ञात चोरट्यांनी २५ लाखांची रोकड लंपास केली. या लूटीचा तासगाव पोलिसांकडून कसून तपास सुरु आहे. चार संशयितांची रेखाचित्रे प्रसिध्द करण्यात आलेली आहेत. रेकॉर्डवरील गुन्हेगारांची चौेकशी सुरु करण्यात आली आहे. मात्र अद्याप धागेदोरे मिळालेले नाहीत.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तासगाव शाखेतून विसापूर शाखेकडे २५ लाख रुपयांची रोकडे दोन कर्मचारी घेवून जात होते. मात्र चार चोरट्यांनी खानापूर फाट्यावर जिरवळ मळ्यानजीक या कर्मचार्यांवर हल्ला करून या रकमेवर डल्ला मारला.या घटनेनंतर तासगाव तालुक्यर्चीं खळबळ उडाली होती. इतकी मोठी रक्कम लुटण्याची तालुक्यातील पहिलीच घटना आहे. त्यामुळे तासगाव पोलिसांनी या चोरीचा तपास गांभीर्याने सुरु केला आहे. चोरी झाल्यापासून पोलिसांनी सर्व शक्यता गृहीत धरून तपासाची सुत्रे हालवली आहेत.
तासगावपासून विसापूरपर्यंत संशयित ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज तपासासाठी ताब्यात घेतले आहे. संबंधीत कर्मचार्यांनी सांगितलेल्या वर्णणावरून चारही चोरट्यांचे रेखाचित्र तयार केले आहे. सांगलीसह शेजारील जिल्ह्यातील पोलिसांनाही या चोरीच्या घटनेबाबत माहिती दिली आहे. पोलिस उपाधीक्षक अशोक बनकर, पोलिस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांच्यासह पोलिस पथकाने या चोरीचा उलगडा करण्यासाठी लक्ष केंद्रीत केले आहे. मात्र अद्याप कोणताही सुगावा लागला नाही. परंतु लवकरच या चोरीचा उलगडा होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.