सांगली | जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज माघारीनंतर महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी निवडणूक होत आहे. चिन्ह वाटपानंतर निवडणुकीच्या प्रचाराला बुधवारी सुरुवात झाली. सोसायटी गटांतील निवडणूक चुरशीची होत असून मातब्बर नेते या गटातून निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष आहे. मर्यादित मतदार संख्येमुळे मतदारांची पळवापळवी अन् दर यामुळे सोसायटी गट सर्वाधिक चर्चेत आला आहे.
सोसायटी गटाच्या दहा जागांपैकी तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित सातपैकी वाळवा, कडेगाव व कवठेमहांकाळ वगळता उर्वरित जत, आटपाडी, तासगाव व मिरजेत जोरदार चुरस होणार आहे. जिल्हा बँकेसाठी सोसायटी गटाच्या दहा जागा आहेत. दहा तालुक्यांतील या दहा जागांवर तालुक्याचे प्रमुख नेते, आमदार यांचे कायम वर्चस्व राहिले आहे. अर्ज माघारीच्या दिवशीच शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक, खानापूरचे आमदार अनिलभाऊ बाबर व पलूसचे महेंद्र लाड हे बिनविरोध निवडून आले आहेत.
त्यामुळे आता सोसायटीच्या केवळ सात जागांसाठी निवडणूक होत आहे. यामध्ये कडेगावमधून मोहनराव कदम, वाळव्यातून बँकेचे विद्यमान अध्यक्ष दिलीपतात्या पाटील व कवठेमंकाळमधून माजी मंत्री अजितराव घोरपडे निवडणूक लढवत आहेत. या तीनही ठिकाणी तुल्यबळ उमेदवार दिसत नाहीत. त्यामुळे या तिन्ही तालुक्यातील सोसायटी गटाची निवडणूक एकतर्फी होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र उर्वरित चार गटांमध्ये मात्र मोठी चुरस होणार आहे.