सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक कामे करता येतात, त्यामुळे नगरसेवकांची कामे आयुक्तांनी प्रलंबित ठेवली आहेत. मात्र आमराईत बेकायदेशीररित्या आयुक्तांनी काम सुरू केले आहे. कोरोना आपत्तीच्या काळात झालेल्या खर्चाचा हिशेेब जाहीर केला नाही. गेल्या ५० दिवसांपासून आयुक्तांचा हुकुमशाही कारभार सुरू असल्याचा आरोप महापौर गीता सुतार यांनी केला. या संदर्भात मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे तक्रार करणार असून जिल्हाधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महापौर गीता सुतार यांनी आमराईत जावून सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. कोरोनाच्या काळात आमराईत तीन गेट बसविण्यात आले आहेत. शिवाय पेव्हिंग ब्लॉकची कामेदेखील सुरू आहेत. या कामांना वर्क ऑर्डर आहे का? कोणत्या फंडातून ही कामे सुरू आहेत. अशी माहिती शहर अभियंता, उद्यान अधीक्षक व शाखा अभियंता यांना विचारली होती. मात्र त्यांनी माहिती देण्यास नकार दिला. ठेकेदाराला देखील विचारले. त्यांनी पण माहिती दिली नाही. महापालिकेच्या एकाही पदाधिकारी व नगरसेवकाला या कामाची माहिती नाही. कोरोनाच्या काळात अत्यावश्यक कामे करता येतात. मात्र त्यांनी कोरोनाच्या परिस्थितीमध्ये केवळ अत्यावश्यक कामे करता येतात. असे सांगितले होते. मग आमराईतले असे काय अत्यावश्यक काम सुरू आहे? आयुक्तांकडून मनपा पदाधिकारी व नगरसेवकांची केवळ दिशाभूल सुरू असल्याचा आरोप महापौर सुतार यांनी केला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन होता. या काळात महापालिकेने केलेल्या खर्चाच्या हिशोबावरून आरोप होत होते. त्यामुळे महापालिकेची बदनामी होते. हा मुद्दा विशेष महासभेत उपस्थित झाला होता. आयुक्तांनी महापालिकेच्या वेबसाईडवर खर्च प्रसिध्द करण्याची ग्वाही दिली होती. मात्र त्यांनी खर्च सादर केला नाही. अधिकाऱ्यांना या संदर्भात प्रश्न विचारले तरी उत्तर देत नाहीत. कोरोनाच्या काळात त्यांचा हा हुकुमशाही कारभार सुरू आहे. त्यांच्या कारभाराची जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करावी, अशी मागणी करणार असल्याचे महापौर सुतार यांनी सांगितले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.