सांगली प्रतिनिधी । महापालिकेच्या दर सुधार समितीने बंद पाणीमिटर, अस्वच्छ भूखंड, खोकी हस्तांतर, दुकानगाळ्यांची भाडेपट्टी, दैनंदिन परवाना फी, बांधकाम शुल्क, हॉटेल व बिअर बार परवान्यासह इतर लागणाऱ्या ‘एनओसी’मध्ये दुप्पट ते तिप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा प्रस्ताव प्रशासनाने देखील तयार केला आहे. हा प्रस्ताव महासभेला जाणार असल्याने नवीन वर्षात महापालिका क्षेत्रातील व्यवसायिक व नागरिकांना करवाढीचा दणका बसणार आहे. मनपाचे आर्थिक उत्पन्न वाढीसाठी करवाढ करणे अटळ असल्याचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी स्पष्ट केले.
महापालिकेत विविध कर, दाखला फीबाबतचे सुधारीत दर वाढवणे अथवा कमी करण्यासाठी दरसुधार समिती गठीत केली जाते. आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही समिती असते. त्यानुसार या समितीची नुकतीच बैठक पार पडली आहे. या बैठकीत अनेक प्रकारावर करवाढ लादली जाणार आहे. याबाबत माहिती देताना आयुक्त नितीन कापडणीस म्हणाले,” महापालिकेच्या चालू वर्षाचे अपेक्षीत उत्पन्न १४० कोटी रूपये अंदाजपत्रकात गृहीत धरले आहे. यातील आजअखेर केवळ ३४ कोटी रूपयेच वसुल झाले असून याचा परीणाम विकास कामांवर होणार आहे.
त्यामुळे काही परवाना शुल्क आणि इतर करात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून १५ कोटी उत्पन्न मिळेल. तर उद्यानात फोटोग्राफी, शुटींग केले जाते. त्याच्या फीमध्ये वाढ करण्यात आली असून आता व्यावसायिक मालिकांच्या शुटींगसाठी २ हजार ५०० रुपये तर चित्रपटासाठी ५ हजार रुपये, प्री वेडिंग फोटोसाठी ३०० तर व्हिडीओ शुटींगसाठी ५०० रुपये शुल्क आकारला जाणार असल्यामुळे मनपाच्या उत्पन्नातही वाढ होईल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे.