सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
महापालिकेचा सन २०१९-२० चा सुमारे ७६६ कोटी ८१ लाखांचे कर वाढ नसलेले बलून बजेट स्थायी समितीचे सभापती अजिंक्य पाटील यांनी विशेष महासभेत महापौरांकडे सादर केले. कृष्णा नदी प्रदूषणमुक्त करणे, शेरीनाला योजना पूर्ण करणे, प्रभाग समित्या सक्षम करणे, ई-टॉयलेट, अतिथीगृह विकसीत करण्याससह अनेक योजनांची घोषणा केली. तर दुसरीकडे उत्पन्न वाढीसाठी घरपट्टी व पाणीपट्टी विभागावर भरीव तरतूद केली आहे. दरम्यान, सदस्यांना अर्थसंकल्पावर अभ्यास करण्यासाठी महापौरांनी दि. २४ जुलैपर्यंत सभा तहकूब ठेवली.
महापालिकेची अर्थसंकल्पीय सभा महापौर संगीता खोत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. महापालिका प्रशासनाच्यावतीने तत्कालिन आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी सन २०१९-२० चा सुमारे ७४९ कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समितीकडे सादर केला होता. मात्र लोकसभेच्या आचारसंहितेमुळे स्थायी समितीला अर्थसंकल्प तयार करण्यास विलंब झाला. अखेर आजच्या विशेष महासभेत सभापती अजिंक्य पाटील यांनी महापौर संगीता खोत यांच्याकडे सन २०१९-२० चा ७६६ कोटी ८१ लाख ४९ हजार १४ रूपयांचा तर २४ लाख ७९ हजार १७६ रूपये शिलकीचा अर्थसंकल्प सादर केला. शासन व जनरल फंडासह एकूण जमा ७६७ कोटी ६ लाख २८ हजार १९० आहेत.
अर्थसंकल्प सादर करण्यासाठी सभापती सांगलीवाडीतून उघड्या जीपमधून महापालिकेत आले होते. भाजपच्या सदस्यांनी त्यांचे मुख्य प्रवेशव्दाराजवळ स्वागत केले. सभागृहात त्यांनी अर्थसंकल्प सादर करताना नागरिकांनी भाजपला दिलेली सत्ता व भाजपच्या नेत्यांनी सभापतीपदाची संधी दिल्याने आभार मानले.