सांगली : नगरपंचायतीसाठी जिल्ह्यात सरासरी ८०.७६ टक्के मतदान; कवठेमहांकाळ, खानापूर, कडेगावात किती?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली : जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, कडेगाव व खानापूर नगरपंचायतीच्या प्रत्येकी 17 जागा आहेत. मात्र ओबीसी आरक्षणामुळे प्रत्येक नगरपंचायतीच्या चार जागांची निवडणूक एक महिना पुढे गेली आहे. त्यामुळे उर्वरित प्रत्येक नगरपंचायतीच्या 13 जागांसाठी मंगळवारी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत निवडणूक पार पडली. एकूण 21 हजार 847 मतदारांपैकी 17 हजार 379 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. सर्वात जास्त खानापूर नगरपंचायतीसाठी चुरशीने 85.20 टक्के मतदान झाले. नगरपंचायतीच्या एकूण 39 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मत यंत्रात बंद झाले आहे.

कवठेमहांकाळ येथील 13 जागांसाठी 44 उमेदवार रिंगणात होते. एकूण 10 हजार 81 मतदारांपैकी 7 हजार 763 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. या निवडणुकीत 77.01 टक्के मतदान झाले. राष्ट्रवादीने स्वतंत्र पॅनेल उभे केले होते. या पॅनेलचे नेतृत्व राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांनी केले. त्यांच्याविरोधात सर्वपक्षीय आघाडी केली गेली होती. भाजपचे खासदार संजयकाका पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, राष्ट्रवादीच्या जिल्हा बँकेच्या संचालिका अनिता सगरे, गजानन कोठावळे नेतृत्व केले.

या ठिकाणी दुरंगी लढत होत आहे. दिवसभर या ठिकाणी चुरशीने मतदान झाले. कडेगाव नगरपंचायतीच्या 13 जागांसाठी 42 उमेदवार रिंगणात होते. एकूण 7 हजार 809 मतदारांपैकी 6 हजार 242 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. शांततेत सुमारे 79.94 टक्के मतदान झाले. या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपने स्वतंत्र पॅनेल उभे केले होते. येथे तिरंगी लढत झाली.

काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम व भाजपकडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या गटात जोरदार लढत झाल्याचे चित्र होते. राष्ट्रवादीचे आमदार अरूणअण्णा लाड समर्थकांनी देखील पॅनेल उभे केल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली. या ठिकाणी काँग्रेसला सत्ता राखण्याचे मोठे आव्हान आहे. विश्वजीत कदम दिवसभर तळ ठोकून होते. तर खानापूर नगरपंचायतीच्या 13 जागांसाठी 39 उमेदवार रिंगणात होते. या ठिकाणी प्रथमच चुरशीने मतदान झाले. एकूण 3 हजार 954 मतदारांपैकी 3 हजार 369 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. या ठिकाणी 85.20 टक्के मतदान झाले.

किरकोळ वाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. या निवडणुकीत काँग्रेससह तीन स्थानिक आघाड्या झाल्या होत्या. या आघाड्यांमध्ये जोरदार लढत झाली आहे. नगरपंचायतीच्या 39 जागांसाठी मतदान झाले आहे. उर्वरित 12 जागांसाठी 18 जानेवारीला मतदान होणार आहे. त्यानंतर सर्व जागांचा निकाल 19 जानेवारीला लागणार आहे. त्यामुळे निकालासाठी महिनाभर उमेदवारांना वाट पहावी लागणार आहे.

Leave a Comment