सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना गुरुवारी आणखी दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या बळींची संख्या 25 झाली. मिरजेतील 73 वर्षीय हॉटेल व्यावसायिक आणि वाळवा तालुक्यातील शिगाव येथील 52 वर्षाच्या महिलेचा मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले. जिल्ह्यात नव्याने तब्बल 62 रुग्णांची नोंद झाली असून 15 जण कोरोनामुक्त झाले. बाधित रुग्णांचा आठशेचा आकडा पार झाला.
मिरजेत तब्बल 24 तर सांगलीत पाच रुग्ण आढळून आले. आटपाडी तालुक्यात सोळा, शिराळ्यात सात, मिरज तालुक्यातील सहा रुग्ण असून त्यामध्ये दुधगावमधील आरोग्य सेवकाचा समावेश आहे. कडेगाव तालुक्यात दोन, घोरपडीत एक रुग्ण आढळला. जिल्ह्यात आत्तापर्यंत 841 रुग्ण आढळले असून सद्यस्थितीत 396 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान इचलकरंजीतील बारा वर्षीय मुलगा आणि कवठेगुलंदमधील 58 वर्षीय पुरुषाचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला.
सरकारने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यापासून लोक मोठ्या प्रमाणात बाहेर पडले आहेत. नोकरी, व्यवसाय तसेच अन्य कामे सुरु झाली आहेत. त्यामुळे शासकीय कार्यालयांसह खासगी ठिकाणी आणि दुकानांमध्ये गर्दी होत आहे. जुलैला सुरुवात झाल्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या गतीने वाढत आहे. रुग्णांची संख्या वाढली असताना मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. मिरज येथील 73 वर्षीय हॉटेल चालकामध्ये कोरोनाची लक्षणे असल्याने त्या व्यक्तीला उपचारासाठी दाखल केले होते. त्याची तपासणी केली असता पॉझिटिव्ह आला होता. त्याच्यावर उपचार सुरु असताना गुरुवारी मृत्यू झाला. वाळवा तालुक्यातील शिगाव येथील 52 वर्षाच्या महिलेमध्ये कोरोनाची लक्षणे होती, तिला उपचारासाठी मिरजेतील कोविड रुग्णालयात दाखल केले होते, तिचा अहवालही गुरुवारीच आला, त्याचदिवशी त्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्हयातील कोरोनाच्या बळींची संख्या 25 झाली.
मिरज शहरात तब्बल 24 रुग्ण आढळून आले. त्यामुळे शहरात कोरोनाची धास्ती पसरली आहे. मिरज शहर परिसरातीत पंढरपूर रोड, नदीवेस पाटील, मालेगाव रोड, रेवणी गल्ली या भागात कोरोनाचे रूग्ण सापडले आहेत. या सर्व रुग्णांच्या संपर्कातील लोकांचा तपास सुरू असून त्यांना क्वॉरंंटाईन करण्यात येत आहेत. महापालिका प्रशासनाकडून तपासणी मोहिम सुरू आहेत. महापालिका प्रशासनाने आता 60 वयोगटातील नागरिकांची चौकशी व तपासणी सुरू केली आहे. कोणता आजार आहे का, प्रवास केलेला आहे का, ताप, सर्दी, खोकला याबाबतची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.
मिरज तालुक्यात कोरोनाचे सहा रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये सावळवाडी आरोग्य उपकेंद्राकडील 48 वर्षीय आरोग्य सेवक (मूळ गाव दुधगाव) याचा समावेश आहे. कवठेपिरान प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सावळवाडी उपकेंद्रात काम करीत आहे. मागील दहा दिवसांपासून त्याची तब्बेत बरी नव्हती. त्यामुळे तो रजेवर होता. आरोग्य सेवकात कोेरोनाची लक्षणे असल्याने त्याचा मंगळवारी स्वॅब घेण्यात आला होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून कुटुंबातील सहा जणांना संस्था क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. याशिवाय संपर्कातील लोकांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले. आरोग्य सेवक राहत असलेल्या परिसरामध्ये कंटनेमेंट झोनची अंमलबजावणी केली जात आहे. बुधगाव येथे तीन, नांदे्र आणि कवलापूर येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 881 रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी पंचवीस व्यक्तींचा मृत्यू झाला असून 420 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 396 कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत.