सांगली मतदारसंघात सेना बंडखोर भाजप उमेदवाराला जेरीस आणणार का?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

सांगली विधानसभा मतदारसंघात भाजपचे बंडखोर शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील व भाजपचे सुधीर गाडगीळ यांच्यात आता थेट लढत होत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे बंडखोर शेखर माने मैदानात असल्याने भाजपच्या उमेदवाराला फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सांगली विधानसभेसाठी एकूण अकरा उमेदवार रिंगणात आहेत. सांगली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी भाजपमध्ये चुरस होती. विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह माजी आमदार दिनकर पाटील, नीता केळकर, जिल्हा परिषदेचे सदस्य शिवाजी डोंगरे इच्छूक होते. पक्षाने पुन्हा सुधीर गाडगीळ यांना उमेदवारी दिल्याने भाजपमध्ये नाराजी पसरली होती. माजी आमदार दिनकर पाटील निवडणुकीच्या मैदानात लढतील, अशी अपेक्षा होती. मात्र त्यांची नाराजी दूर झाली.

अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी मात्र जिल्हा परिषदेचे सदस्य शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे भाजपमध्ये बंडखोरी होणार असा कयास लावला जात होता. मात्र आज वाटाघाटी झाल्याने डोंगरे यांनी निवडणुकीतून माघार घेतली. तर दुसरीकडे शिवसेनेचे बंडखोर शेखर माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. ते अर्ज माघार घेतील, अशी शक्यता होती. त्यांच्या अर्ज माघारीसाठी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून प्रयत्न सुरू होते. मात्र त्यांनी अर्ज माघार घेतला नाही. त्यामुळे महायुतीतील घटक पक्षाने बंडखोरी केल्याचा फटका भाजपच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे. अर्ज माघारीच्या दिवशी तिघांनी माघार घेतल्याने सांगली विधानसभेसाठी आता एकूण अकरा उमेदवार रिंगणात आहेत.

इतर काही बातम्या-