मुंबई इंडियन्सला आव्हान देण्याची ताकद फक्त दिल्ली कॅपिटल्समध्येच ; माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2020 आता अंतिम टप्प्यात आली असून आज गुरुवारी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पहिला क्वालिफायर सामना होणार आहे. दोन्हीही संघ तुल्यबळ असल्याने आजची लढत नक्कीच रंगतदार होण्याची शक्यता आहे. कोणत्याही परिस्थितीत आजचा सामना जिंकून थेट अंतिम फेरीत धडक मारण्याची इच्छा दोन्ही संघांची असेल. चार वेळा ‘आयपीएल’चे जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सने १४ पैकी ९ सामने जिंकत १८ गुणांनिशी गुणतालिकेवर वर्चस्व गाजवले. तर दुसरीकडे पहिलेवहिले जेतेपद पटकावण्यासाठी आतुर असलेल्या दिल्ली कॅपिटल्सने सलगच्या चार पराभवांनंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुला सहा गडी राखून पराभूत करत आपली गाडी रुळावर आणली आहे.

आतापर्यंत झालेल्या स्पर्धेवर मुंबई इंडियन्सने वर्चस्व राखलं असलं तरी माजी भारतीय खेळाडू संजय बांगर यांच्यामते मुंबईला टक्कर देण्याची ताकद सध्या दिल्ली कॅपिटल्स या संघाकडेच आहे. “मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ज्यावेळी प्ले-ऑफचे सामने येतात त्यामुळे तुम्ही याआधी कसा खेळ केला आहे या सर्व गोष्टी मागे पडतात. प्रत्येक संघ या सामन्यात एका वेगळ्या जोशात आणि सर्वोत्तम क्रिकेट खेळण्याच्या हेतूने मैदानात उतरतो. दिल्लीकडे प्ले-ऑफचे सामने खेळण्याचा अनुभव नाही ही गोष्ट जरी खरी असली तरीही त्यांचा यंदाच्या हंगामातला प्रवास हा आश्वासक आहे. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये यश, त्यानंतर लागोपाठ अपयश आणि जिथे गरज आहे तिकडे चांगला खेळ करुन गुणतालिकेत दुसरं स्थान. या संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचा चांगला भरणा आहे.जर मुंबई इंडियन्सला टक्कर देण्याचं आवाहन कोणत्या संघात असेल तर ते फक्त दिल्लीकडेच आहे , अस संजय बांगर म्हणाले.

दरम्यान , कर्णधार रोहित शर्मा दुखापती वर मात करून संघात परतल्यानंतर मुंबई इंडियन्स मध्ये पुन्हा एकदा उत्साह वाढला आहे. रोहितच्या कमबॅक नंतर मुंबई चा संघ अजून मजबूत झाला असून दिल्ली साठी ही लढत नक्कीच सोप्पी नसेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment