हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी दणदणीत विजय मिळवत ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटील आणि भाजपच्या संजयकाका पाटील याना आस्मान दाखवलं. सांगलीतील स्थानिक काँग्रेस नेत्यांनी निवडणुकीत विशाल पाटलांना मदत केल्याचे निकालानंतर स्पष्ट झालं होते. त्यामुळे सांगलीच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात वाद होण्याची शक्यता होती, मात्र शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मात्र विजयी उमेदवार विशाल पाटील यांचे अभिनंदन करत या सर्व वादावर पडदा टाकला आहे. तसेच विशाल पाटील हे महाविकास आघाडीसोबत राहतील अशी आम्हाला सुरुवातीपासूनच खात्री होती असं सांगायलाही राऊत विसरले नाहीत.
आज प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, विशाल पाटील यांच्या विरोधात आम्ही सांगलीत निवडणूक लढलो. शिवसेनेला अपयश आलं आणि विशाल पाटील जिंकले. लोकशाहीत जो जिंकून येतो त्याच स्वागत करायचं असत. वसंतदादा पाटील आणि विशाल पाटील यांच्याशी आमचं व्यक्तिगत भांडण कधीच नव्हतं आणि नसेल. विशाल पाटील हे जिंकलेले असून आम्ही त्यांचं स्वागत करतो.. अभिनंदन करतो. विशाल पाटील हे महाविकास आघाडी सोबतच राहतील याची आम्हाला सुरुवातीपासूनच खात्री होती. लोकांनी विशाल पाटलांना मतदान केलं असून या लोकभावनेचा आदर केला पाहिजे असं म्हणत संजय राऊतांनी विशाल पाटलांबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे.
दरम्यान, सांगली लोकसभेत महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील, भाजपकडून संजयकाका पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील अशी तिरंगी लढत पाहायला मिळाली. यामध्ये विशाल पाटील यांनी १ लाख हुन अधिक मतांनी दणदणीत विजय मिळवला. विशाल पाटील यांच्या विजयात आमदार विश्वजित कदम यांच्यासह स्थानिक काँग्रेस नेत्यांचा सिंहाचा वाटा होता. महाविकास आघाडी एकत्र असतानाही काँग्रेस नेत्यांनी चंद्रहार पाटलांचा प्रचार न करता विशाल पाटील यांच्यामागे आपली ताकद उभी केली.