हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील तणाव प्रचंड वाढला आहे. या दोन्ही गटातील नेते कोणत्या ना कोणत्या कारणावरून टीका करताना दिसत आहेत. आता दिल्लीतील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आल्यामुळे यावर उद्धव ठाकरे गटाचे नेते (Uddhav Thackeray Group) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दिल्लीतील एका कार्यक्रमामध्ये मंगळवारी शरद पवारांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘महदजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. मात्र, या सत्कारामुळे शिवसेना ठाकरे गट संतप्त झाला आहे. आता संजय राऊत यांनी या मुद्द्याला धरूनच टीका केली आहे. यावेळी, “शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा नव्हे, तर प्रत्यक्ष अमित शाह यांचा सत्कार केला आहे,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
त्याचबरोबर, “शिंदे यांनी महाराष्ट्रातील सरकार पाडले, शिवसेना फोडली आणि मराठी जनतेच्या विश्वासाला तडा दिला. अशा व्यक्तीचा सन्मान राष्ट्रवादीसारख्या पक्षाच्या नेत्यांनी करणे योग्य नाही. जे लोक महाराष्ट्राचे तुकडे करतात, जे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावतात, त्यांचा सार्वजनिकरित्या सत्कार केला जात असेल, तर आम्ही महाराष्ट्रातील जनतेसमोर कोणत्या तोंडाने जाऊ?” अशा शब्दात राऊत यांनी घणाघाती प्रहार केला आहे.
शरद पवारांवर नाराजी
इतकेच नव्हे तर या सत्कारानंतर संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर देखील टीका केली आहे. राऊत म्हणाले की “शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून आम्ही त्यांचा आदर करतो. मात्र, ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला, त्यांचा सन्मान करून पवार साहेबांनी मराठी माणसाच्या भावना दुखावल्या आहेत.” यामुळे आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील वाद देखील वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.