हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना ठाकरे गटाचे फायरब्रॅन्ड नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) याना माझगाव सत्र न्यायालयाने १५ दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊत यांना न्यायालयाने दोषी ठरवण्यात आले असून त्यांना पुन्हा एकदा तुरुंगात जावं लागणार आहे. आयपीसीच्या कलम 500 अंतर्गत ही याचिका दाखल करण्यात आली होती. अखेर हि सुनावणी सोमय्या यांच्या पत्नीने जिंकली आणि संजय राऊतांना कोर्टाने शिक्षा ठोठावली.
मीरा भाईंदर शौचालय प्रकरणात मेधा सोमय्यांवर आरोप केला होता. मेधा सोमयय्या यांनी सार्वजनिक प्रसाधनगृहाच बांधकाम आणि देखभालीच्या कामात 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. संजय राऊत यांचे हे आरोप तथ्यहीन आणि बदनामीकारक आहेत, असं म्हणत मेधा सोमय्या यांनी त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. या निकालाची सुनावणी आज पार पडली असता न्यायालयाने संजय राऊत हे याप्रकरणी दोषी असल्याचा निकाल दिला. कोर्टाने संजय राऊत यांना 25 हजारांचा दंड आणि 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. संजय राऊत आणि ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
कोर्टाच्या या निकालानंतर मेधा सोमय्या यांनी समाधान व्यक्त केलं आहे. एक सामान्य गृहिणी कशी लढते, तशीच मी लढले. मला न्यायालयाने योग्य तो न्याय दिला आहे. मी समाजसेवा करते आणि शिक्षणही देते, या दोन्ही गोष्टींचा सन्मान न्यायालयाने केला, असे वाटते. शिक्षा होणे महत्त्वाचे आहे कारण अशाप्रकारची बेताल वक्तव्ये करण्याला यामुळे चाप बसेल, अशी प्रतिक्रिया मेधा सोमय्या यांनी व्यक्त केली.