चंद्रकांतदादा, आपण तर परत एकत्र यायला पाहिजे; राऊतांच्या विधानाने चर्चाना उधाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील ११ जागांच्या विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे विधानभवनातं नेत्यांची मांदियाळी बघायला मिळाली. अनेक स्वपक्षीय आणि विरोधी नेते एकमेकांना भेटले, चर्चा झाल्या. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार, चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची भेट घेतली. यावेळी चंद्रकांतदादांना बघताच राऊतांनी (Sanjay Raut) केलेल्या एका विधानाने राजकीय खळबळ उडाली आहे. चंद्रकांतदादा, आपण तर परत एकत्र यायला पाहिजे असं राऊत म्हणाले. महत्वाची बाब म्हणजे त्याठिकाणी काँग्रेसचे आमदार भाई जगताप हे सुद्धा उपस्थित होते.

खरं तर संजय राऊत हे भाजपचे टोकाचे विरोधक मानले जातात. केंद्र सरकार असो व राज्य सरकार असो.. सरकारच्या चुकीच्या धोरणावर आवाज उठवण्यात संजय राऊत अग्रेसर असतात. महाविकास आघाडी सरकार असतानाही संजय राऊत भाजपच्या प्रत्येक आरोपांना उत्तरे देत होते आणि प्रत्येक वार स्वतःच्या अंगावर घेत होते. शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतरही राऊतांनी तोफ भाजप आणि एकनाथ शिंदेंवर धडाडत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते देवेंद्र फडणवीसांपर्यंत… सर्वच भाजप नेत्यांना संजय राऊत शिंगावर घेत असतात आणि महाविकास आघाडीची बाजू भक्कमपणे मांडत असतात. मात्र त्याच राऊतांनी आजच्या मतदानाच्या दिवशी चंद्रकांत पाटलांना परत एकत्र येण्याबाबत विधान केल्याने चर्चाना उधाण आलं आहे.

यानंतर आपल्या या विधानानंतर संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिले आहे. आमच्यातील संवाद राजकीय नव्हता, चहा पिण्यासाठी एकत्र येऊया, असं म्हणायचं होतं, माझी लाईन कधीही चुकत नाही, असं देखील संजय राऊत म्हणाले. राजकारणात आम्ही दिल्लीत मोदींना भेटतो, अमित शाह लॉबीत भेटतात. चंद्रकांत पाटील हे राज्याचे मंत्री आहेत. आमचे त्यांचं व्यक्तिगत भांडण नाही. ते वैचारिक भांडण आहे असं म्हणत संजय राऊत यांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिले. तसेच विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार विजयी होतील असा विश्वासही राऊतांनी व्यक्त केला.