हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बेळगाव महापालिकेसाठी तब्बल आठ वर्षानंतर आज मतदान होत असून या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समिती आणि आम्ही सगळे मिळून 30 च्या आसपास जागा जिंकू आणि पुन्हा एकदा बेळगाव महापालिकेवर शिवरायांचा भगवा झेंडा फडकेल असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
या निवडणुकीत मराठी म्हणून एकजूटीने मतदान करा आणि बेळगाव मध्ये मराठी माणसाचाच हक्क आहे हे सिद्ध करण्याची संधी लोकशाहीच्या मार्गाने आपल्याला मिळाली आहे असं आवाहन संजय राऊत यांनी मतदारांना केलं आहे. बहुमतामध्ये सत्ता असलेली महापालिका द्वेशभावनेने बरखास्त केली. भगवा झेंडा उतरवला, अशी अनेक कृत्ये करत कर्नाटक सरकारने लोकशाहीची हत्या केली अस संजय राऊत यांनी म्हंटल.
दरम्यान, बेळगाव महापालिकेच्या एकूण 58 जागांसाठी मतदान सुरू आहे. या निवडणुकीत एकूण 375 उमेदवार रिंगणात आहे. त्यात महाराष्ट्र एकीकरण समितीमार्फत अधिकृत 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया चालणार असून मतदानाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण बेळगाव शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे