हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने मला पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, पण पक्ष आणि विचारधारेसाठी मी ती ऑफर नाकारली असा मोठा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केल्यानंतर देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना विचारला असता गडकरींना पंतप्रधान पदाची ऑफर देण्यात काय चूक आहे? असा उलट सवाल राऊतांनी केला. तसेच ज्या कोणत्या नेत्याने गडकरींना हा सल्ला दिला असेल, मला यात काहीही चुकीचं वाटत नाही असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, नितीन गडकरी हे भाजपमधील सर्वसामान्य असे नेते आहेत. पंतप्रधान पदासाठी तडजोड करा असं त्यांना कोणी सांगितलं असेल असं मला वाटत नाही. मुळात या देशात ज्या पद्धतीची हुकुमशाही किंवा एकाधिकारशाही सुरु आहे. गेल्या दहा वर्षांपासून आणीबाणी लावण्याचा प्रयत्न सुरु आहे, त्याच्याशी तडजोड करु नका, त्या प्रवृत्तीशी तडजोड करु नका, ही भूमिका जर विरोधी पक्षातील एखाद्या प्रमुख नेत्याने त्यांच्यापुढे कोणी मांडली असेल, तर त्यात मला काहीही चुकीचं वाटत नाही असं राऊत यांनी म्हंटल.
आज जे कोणी सरकारमध्ये बसून देशातील मूल्यांची तडजोड करत आहेत तो एक राष्ट्रीय अपराध आहे. नितीन गडकरी या सगळ्याच्या विरोधात बोलत राहिले, आपला आवाज मांडत राहिले. म्हणूनच त्यांना कोणी विरोधी पक्षाच्या नेत्याने सल्ला दिला असेल तर फास त्रास होण्याचे कारण नाही. जगजीवन राम यांनी १९७७ साली काँग्रेस पक्षातून याच मुद्द्यावरुन बंड केले होते. देशात लोकशाही टिकवायची असेल तर काही जणांना सत्तेचा त्याग करावा लागतो, असं संजय राऊतांनी म्हंटल.
गडकरी काय म्हणाले होते?
नागपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले, मी त्या नेत्याचे नाव सांगत नाही. पण त्याने मला सांगितले होते की, तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. पण त्यावर मी त्यांना विचारलं की, तुम्ही मला पंतप्रधानपदासाठी का पाठिंबा देणार आहात आणि मी तो पाठिंबा का घ्यावा? पंतप्रधानपद हे माझ्या आयुष्यातील ध्येय नाही. मी माझ्या तत्वांशी आणि पक्षसंघटनेशी एकनिष्ठ आहे. मी पंतप्रधानपदासाठी या तत्त्वांशी आणि पक्षाशी प्रतारण करणार नाही. ही तत्त्वं हीच भारतीय लोकशाहीची सर्वात मोठी ताकद आहे, असे नितीन गडकरी यांनी म्हटले. विरोधी पक्षाच्या कोणत्या नेत्याने नितीन गडकरींना (Nitin Gadkari) पंतप्रधान पदाची ऑफर दिली हे मात्र गडकरींनी सांगितलं नाही. मात्र त्यांच्या या नव्या गौप्यस्फोटाने पुन्हा एकदा नितीन गडकरींचं नाव पंतप्रधान पदासाठी चर्चेत आलं हे मात्र नक्की….