कृषिमंत्री शुद्धीत आहेत का? संजय राऊतांची धनंजय मुंडेंवर टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस (Maharashtra Rain) कोसळत आहे. खास करून मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. नांदेड, हिंगोली, परभणी, या जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असून शेतकऱ्यांचे कष्टाचे पीक (Farmers Crop Damage) डोळ्यादेखत वाहून गेलं आहे. यामुळे शेतकरी चांगलाच हवालदिल झाला असून झालेल्या नुकसानीची मागणी सरकारकडे केली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी काल नुकसान पाहणी दौरा करून शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनीही पाहणी दौरा केला. मात्र इतके दिवस कृषी मंत्री कुठे होते? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) केला आहे.

संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधत म्हंटल, काल आम्ही दुष्काळी भागात होतो. परभणी, हिंगोली, संभाजीनगर येथील रस्ते वाहून गेले. ज्यांची घरे शाळा गुरंढोरं वाहून गेली त्या लोकांनी त्यांनी कागदपत्रे आमच्यासमोर ठेवली. या ग्रामीण भागातील रस्त्याची कामे गुजरातच्या ठेकेदारांना दिली आहेत. शेतकऱ्यांचे सर्व काही वाहून गेलं आहे तरीही सरकारने अजून पंचनामा केला नाही. आदित्य ठाकरेंचा दौरा जाहीर झाल्यानंतर सरकारला जाग आली. कृषिमंत्री इतका दिवस कुठे होते? या राज्याला कृषिमंत्री आहेत का तरी असा प्रश्न पडतोय. आदित्य ठाकरे येणार आहेत हे कळल्यावर कृषिमंत्री काही भागात पाहणी करायला गेले मात्र ते गाडीतून उतरले सुद्धा नाहीत, त्यांनी जमिनीला पाय सुद्धा लावला नाही. उलट मदतीची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांवर कृषिमंत्री ओरडत होते कि मी काय करू? मी तुमच्या शेतात काम करू का? असं काही शेतकऱ्यांचं म्हणणं असल्याचे संजय राऊतांनी म्हंटल.

संजय राऊत पुढे म्हणाले, कृषिमंत्री शुद्धीत आहेत का? जबाबदारी कोणाची आहे? हजारो शेतकऱ्यांचे पीक आणि त्यांचा संसार वाहून गेला आहे, या सगळ्याचा पंचनामा आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केला आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत तुम्ही जे काही करत आहात ते शेतकरी कधीही विसरणार नाही असा इशाराही संजय राऊत यांनी राज्य सरकारला दिला.