हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) जागावाटप सुरु असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काँग्रेसला (Congress) सुनावलं आहे. काँग्रेसने आत्तापासूनच थेट मुख्यमंत्रीपदावर दावा करु नये, अजून जागावाटप बाकी आहे. तुमच्या काही जागा या आमच्यामुळेच वाढल्या आहेत हे ते विसरले असतील. मात्र राज्यातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशा प्रकारचा निर्णय घेणार नाहीत. जर कोणाला वाटत असेल कि आमचा आत्मविश्वास वाढला आहे तर निवडणुकीनंतर तो अभ्यासाचा विषय ठरेल, मोठा भाऊ, लहान भाऊ अशी खुमखमी कोणाच्यात असेल तर महाराष्ट्रात काय चित्र आहे ते भविष्यात कळेल असा इशाराही संजय राऊतांनी काँग्रेसला दिला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Sanjay Raut Warn Congress)
संजय राऊत म्हणाले, महाविकास आघाडीची आज जागावाटपासंदर्भात महत्वाची बैठक पार पडणार आहे. जो जिथं जिंकणारा उमेदवार असेल त्यालाच संधी दिला जाईल. लोकसभा निवडणुकीत ज्या मजबुतीने महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष लढले त्याच मजबुतीने आम्ही विधानसभा निवडणूक सुद्धा लढू असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला. लोकसभेला फक्त ४८ जागा असल्याने जागावाटप करणं सोप्प होते. मात्र विधानसभा निवडणुकीत २८८ जागांचा विषय आहे आणि आमचे जे छोटे मित्रपक्ष आहेत त्यांनाही आम्हाला सामावून घ्यायचं आहे. नक्कीच आम्ही यात यशस्वी होऊ असेही संजय राऊत यांनी म्हंटल.
दरम्यान, बच्चू कडू, राजू शेट्टी, छत्रपती संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकर यांच्याकडून तिसऱ्या आघाडीचे प्रयत्न सुरु आहेत. याबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले, तिसरी आघाडी हे कायमच सत्ताधाऱ्यांना मदत करण्यासाठी बनवलेली असते. जे राज्यात आणि केंद्रात सत्तेत असतात ते तिसरी आघाडी बनवून विरोधकांच्या मतांमध्ये दुफळी माजवतात, हा आत्तापर्यंतचा इतिहास आहे. खरं म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती मध्ये विधानसभेची लढत आहे,पण महाविकास आघाडीची काही मते कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या आघाड्या स्थापन करायच्या, पैशाचा वापर करायचा असं धोरण मला दिसत आहे असेही संजय राऊतांनी म्हंटल.
यावेळी संजय राऊतांनी मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावरूनही निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी येतात आणि जातात. आपण नक्की कसलं उद्धाटन केलंय हे देखील त्यांना माहिती नसतं, ही महाराष्ट्राची परिस्थिती आहे. खरंतर या राज्याच्या संदर्भात भाजप डळमळीत आणि अस्थिर झाला आहे. औद्योगिकदृष्ट्या कमजोर झालेला आहे. आजही इथले उद्योग गुजरातला जातायत. त्याचं सर्वस्वी कारण म्हणजे नरेंद्र मोदी येतात आणि रिबीन कापून जातात. उद्योगाचे काय? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.