कुठे आहेत ते 56 इंच छातीवाले? अत्याचाराच्या घटनांवरून राऊतांचा मोदींवर निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील आठवडाभरात महाराष्ट्र्रात आणि देशात बलात्कार, अत्याचार आणि हत्या यांसारख्या अनेक घटना समोर आल्यात. खास करून लहान मुलींना नराधमांकडून टार्गेट केलं जात आहे. देशातील या बदलेल्या वातावरणामुळे सर्वसामान्य माणूस संताप व्यक्त करत आहे तसेच अशा पराकारचे कृत्य करणाऱ्या आरोपीना लवकरात लवकर कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली जात आहे. या एकूण संपूर्ण घटनांनी राजकारण सुद्धा तापलं असून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करत आहेत. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामनातील रोखठोक सदरातून भाजपवर निशाणा साधलाय. कुठे आहेत ते ५६ इंच छातीवाले या मथळ्याखाली राऊतांनी देशातील बलात्कारी घटनांचा पाढाच वाचला आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

जिथे जिथे भाजप’ची सरकारे आहेत त्या प्रत्येक ठिकाणी महिलांवरील अत्याचार, बलात्काराची प्रकरणे किळसवाण्या पद्धतीने समोर आली व त्यावर भाजपने आणि त्यांच्या महिला मोर्चाने कधीच तोंड उघडले नाही. कोलकात्यातील बलात्कार प्रकरणाचे पडसाद देशात उमटावेत यामागे भाजपची यंत्रणा पद्धतशीर काम करीत असते, पण महाराष्ट्रातील बदलापूर, उरण, उत्तर प्रदेशातील हाथरस, उन्नावसारख्या प्रकरणांवर भाजप व त्यांचे नेतृत्व गप्प बसते. महिला अत्याचाराच्या बाबतीत सध्याच्या सत्ताधाऱ्यांचे दुहेरी मापदंड आहेत. बलात्कार, विनयभंग अशा आरोपाखाली अटकेत असलेल्या व त्या गुह्याबाबत शिक्षा ठोठावलेल्या अनेक आरोपींवर भाजपची खास मेहेरनजर आहे. कुस्तीपटू विनेश फोगाट, साक्षी मलिकसह अनेक महिला कुस्तीपटूंनी त्यांच्यावरील लैंगिक अत्याचारांबाबत आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलने केली, पण मोदी व त्यांच्या सरकारने काहीच कारवाई केली नाही. जणू बलात्काराला मोदींच्या सरकारने राजमान्यताच बहाल केली. जगातला सर्वात मोठा बलात्कारी प्रज्वल रेवण्णा याच्या लोकसभा प्रचारासाठी पंतप्रधान मोदी कर्नाटकात गेले व या त्यांच्या लाडक्यास शाबासकी दिली.

गुरमीत राम रहिम हा बाबा भाजपचा खास प्रिय आहे. बलात्कार आणि खुनाच्या आरोपाखाली हे बाबा तुरुंगात आहेत व त्यांना या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावली. गेल्या दीड वर्षात हे बाबा किमान 17 वेळा पारोलवर बाहेर आले. त्यांच्या वाढदिवसाला तसेच लोकसभा, पंजाब, हरयाणाच्या निवडणुकांत सरकार या बाबांवर मेहेरबानी करते व ते मोठ्या सुट्टीवर बाहेर येतात. हे काँग्रेसच्या राज्यात घडले असते तर स्मृती इराणी छाप नेत्यांनी रस्त्यावर उतरून धिंगाणा घातला असता. सध्या आसाराम बापूही पारोलवरच आहे. वाराणसी विमानतळावर पंतप्रधानांचे स्वागत भाजपचे जे पदाधिकारी करतात ते पुढे बलात्काराचे आरोपी होतात. भाजपच्या विकृत चारित्र्याच्या अशा किती कहाण्या सांगाव्यात?

बदलापुरातील दोन लहान मुलीवर शाळेतच अत्याचार झाले. शाळेचे पालकत्व भाजपशी संबंधित व्यक्तीकडे आहे. याचा अर्थ त्या व्यक्तीच्या हुकुमाने अत्याचार झाले असा होत नाही. पण ही संस्था काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असती तर एव्हाना देवेंद्र फडणवीस व त्यांच्या महिला मंडळाने बदलापुरात जाऊन शाळेच्या पायरीवर फतकल मारली असती, पण आज ते बलात्कारावर वेगळेच प्रवचन झाडत आहेत. बदलापुरात उद्रेक सुरू असताना भाजपचे योगीराज असलेल्या उत्तर प्रदेशात दोन युवतींवर बलात्काराच्या घटना घडल्या. मुरादाबादच्या ठाकूरद्वारा भागात एका इस्पितळात डाक्टरने एका नर्सला ‘बंधक’ बनवून तिच्यावर बलात्कार केला. कोलकात्यातील बलात्कार प्रकरणाइतकेच हे प्रकरण गंभीर आहे. त्याच वेळी प्रयागराजमध्येही याच पद्धतीचे बलात्कार कांड घडले. पाटण्यात एका मुलीस गुंडांनी घरातून उचलून नेले. बलात्कार करून तिची हत्या केली. या घटना देशभरात घडत आहेत.

बलात्कार, विनयभंग, महिलांवरील अत्याचार ही एक विकृती आहे व त्याचा कोणत्याही धर्माशी संबंध नाही. बलात्कार करणारा मुसलमान असेल तर हिंदू समाजाला भडकवून रस्त्यावर उतरवले जाते. ‘लव्ह जिहाद’च्या नावाने आरोळ्या ठोकल्या जातात. उरण येथील यशश्री शिंदवर अत्याचार करणारा मुसलमान होता. त्याविरोधात भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चे काढले, पण बदलापूर प्रकरणातील नराधम हा हिंदूच आहे व जेथे अत्याचार झाला ती शिक्षण संस्था हिंदुत्ववाद्यांची आहे. पोलीस याप्रकरणी गुन्हा नोंदवायला तयार नव्हते. कारण संस्था भाजपवाल्यांची होती. गृहमंत्री फडणवीस भाजपचेच.

देशातील महिला अत्याचारांची मालिका मोठी आहे. खैरलांजी, दिल्लीची निर्भया, मुंबईतील शक्ती मिल, कठुआ, उन्नाव, कोपर्डी, हैदराबाद, हाथरस, बलरामपूर, उरण, उत्तराखंड, केरळ, मध्य प्रदेश म्हणजे संपूर्ण भारतभर बलात्काराच्या विकृतीने थैमान घातले आहे. पर्यटनासाठी भारतात येणाऱ्या परदेशी महिलांच्या विनयभंग प्रकरणांतही वाढ झाली आहे. मणिपूरसारख्या भारतीय राज्यात महिलांना रस्त्यावर आणून त्यांच्यावर बलात्कार करण्याचे प्रकार घडल्यावरही देशाचे राज्यकर्ते षंढासारखे गप्प बसले. द्रौपदीचे वस्त्रहरण होत असताना दरबारातील सर्वच छप्पन इंच छातीवाले माना खाली घालून बसले होते. त्याच हिंदुत्ववादी पद्धतीने देशाचा सत्ताधारी पक्ष गप्प बसला आहे. विकृतीचा उगम राज्यकर्त्यांकडून होतो. तो खाली प्रजेत झिरपतो. 370 कलम काढणे, सेक्युलर समान नागरी कायदा आणणे, कायद्याचे कलम बदलणे किंवा ब्रिटिशकालीन कायद्यांचे नामांतर करणे अशा फुटकळ कामात भाजपला भलताच रस आहे. हिंदुस्थानात महिलांवरील अत्याचारांत वाढ होत आहे. कायदा व सुव्यवस्था ढेपाळत आहे आणि देशाचे गृहमंत्री श्री. शहा हे बांगलादेशातील हिंदूंची संख्या कशी घटली यावर भाषणे देत देशाचा छळ करीत आहेत. असे राज्यकर्ते लाभल्यावर देशातील महिलांची सुरक्षा बदलापूर, हाथरस, उन्नावच्या चव्हाट्यावरच येणार! असं म्हणत सांज राऊतांनी संताप व्यक्त केलाय .