मोदी शेवटी कुबड्यांवरच आले; रोखठोक मधून राऊतांचा घणाघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. यंदा भाजपला स्पष्ट असं बहुमत मिळाल नाही. मात्र नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या पाठिंब्याने मोदी आज पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून मोदींवर टीका केली आहे. मोदी शेवटी कुबड्यांवर आले या मथळ्याखाली राऊतांनी मोदींवर चौफेर टीका केली.मोदी पुन्हा शपथ घेतील, पण त्यांना कुबडय़ा घेऊन राष्ट्रपती भवनात जावे लागेल असा टोला संजय राऊतांनी लगावला.

संजय राऊतांनी काय म्हंटल?

भाजपला 234 जागाच मिळाल्या व बहुमताच्या आकडय़ापासून 40 जागा दूर ठेवले. नरेंद्र मोदींचा हा पराभव आहे. तरीही मोदी यांनी आता ‘एनडीए’चे सरकार म्हणून तिसऱ्यांदा शपथ घ्यायचे ठरवले. मोदी हा देवाचा माणूस (असा त्यांचा दावा), पण देवाचा माणूस सत्तेशिवाय जगू शकत नाही व बहुमताचे कडबोळे बांधून मोदी सिंहासन प्राप्तीसाठी राष्ट्रपती भवनात दाखल झाले. लोकसभा निकालाने मोदी व त्यांच्या लोकांचे पाय जमिनीवर येतील असे वाटले होते, पण बहुमत नसतानाही मोदी नितीश कुमार, चंद्राबाबू, चिराग पासवान यांच्या कुबडय़ा घेऊन सरकार बनवीत आहेत. नितीश कुमार यांच्या ‘जदयु’ पक्षाला 12 व चंद्राबाबूंच्या तेलुगू देसमला 16 जागा मिळाल्या. त्यामुळे या दोघांच्या अटी मानून मोदी सरकार बनवतील, पण चालवू शकतील काय? 5 जून रोजी मी दिल्लीत होतो. मोदींनी बोलावलेल्या बैठकीस नितीश व चंद्रा हे दोन बाबू उपस्थित होते. मोदी यांना पाठिंबा द्यायच्या बदल्यात या दोन्ही बाबूंना जे हवे ते दिले जाईल काय? चंद्राबाबू यांना लोकसभा अध्यक्षपद, गडकरींकडे असलेले बांधकाम, रस्ते उभारणी व ऊर्जा मंत्रालय हवे, तर नितीश कुमारांना गृह, संरक्षण, परिवहन अशी खाती हवीत. शिवाय रेल्वे खातेही बिहारकडे असावे व ते चिराग पासवान यांच्या पक्षाकडे असावे अशी नितीश कुमारांची भूमिका आहे. मोदी व शहा यांचा प्राणच ओरबाडून घेण्याचा हा प्रकार आहे. शिवाय इतर लहान पक्षांच्या गरजा पूर्ण कराव्या लागतील. या सगळय़ा व्यवहाराची मोठी किंमत उद्या देशाला चुकवावी लागेल.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीबरोबर जी तीन प्रमुख पात्रे आहेत, त्यातील एक चिराग पासवान. त्यांचे पाच खासदार बिहारातून निवडून आले. रामविलास पासवान यांचे ते चिरंजीव. रामविलास पासवान हे अनेक वर्षे एनडीएबरोबर राहिले. त्यांचे अकाली निधन झाले. आपल्या वडिलांचे अंत्यसंस्कार आटोपून चिराग दिल्लीतील जनपथावरील निवासस्थानी पोहोचले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. सीपीडब्ल्यूडी विभागाने निर्घृणपणे पासवान यांच्या बंगल्यातील सर्व सामान बाहेर काढून अक्षरशः फेकले होते. त्यात रामविलास यांच्या पुतळय़ाची मोडतोड झाली. चिराग यांनी बंगला आणखी काही काळ राहावा म्हणून भाजपच्या अनेक मंत्र्यांना फोन केले. नड्डाही त्यात होते, पण त्यांचा फोन घेण्याचे सौजन्य कोणी दाखवले नव्हते. याच चिराग पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष मोदी-शहांनी फोडला व त्यांच्या काकांच्या हाती दिला. चिराग यांचे चिन्ह, पक्ष, सर्व काही हिरावून घेतले. ते पासवान आज मोदींचे सरकार पुन्हा अवतरावे म्हणून बजरंग बलीच्या भूमिकेत दिल्लीत वावरत आहेत.

नितीश कुमार यांच्याविषयी न बोललेलेच बरे. त्यांचे राजकीय चारित्र्य उघडे आहे. चंद्राबाबू नायडू यांच्यासाठी ‘एनडीए’चे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत, अशी गर्जना अमित शहा यांनी आंध्रात जाऊन केली होती. नायडू हे फसवणारे, शब्द न पाळणारे गृहस्थ असल्याचे अमित शहांचे बोलणे होते, तर 2019 साली नायडू यांनी मोदी यांना ‘लोकशाहीचे मारेकरी’ म्हटले. मोदी हे अत्यंत पद्धतशीररीत्या देशाच्या घटनात्मक संस्था मोडीत काढीत आहेत. त्यामुळे भारतीय लोकशाही धोक्यात असल्याची भीती श्री. नायडू यांनी व्यक्त केली. मोदी यांच्या हुकूमशाही कचाटय़ातून सीबीआय, रिझर्व्ह बँक आणि घटनात्मक संस्था, निवडणूक आयोगही सुटलेला नाही असे नायडू यांचे जाहीर बोल होते. मोदी-शहांचा निवडणूक आयोग ईव्हीएम मशीनचा घपला करून निवडणुका जिंकत असल्याचा त्यांचा आरोप खळबळजनक होता. आता तेच चंद्राबाबू हे मोदी-शहांचे सरकार बनावे यासाठी पुढाकार घेत आहेत. लोकशाहीने कायमचे डोळे मिटावेत अशा या घटना दिल्लीत घडत आहेत.

भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्ष मदत करू पाहणारे नेते व त्यांचे पक्ष या निवडणुकीत लोकांनी फेकून दिले. उत्तर प्रदेशात मायावतींचे राजकारणच संपले असा निकाल लोकांनी दिला. जेथे मोदी-शहांनाच लोकांनी झिडकारले तेथे इतरांचे काय? महाराष्ट्रात महाविकास आघाडीने 30 जागा जिंकून देवेंद्र फडणवीसांचे ‘मी परत येईन’ नाटक बंद पाडले. अजित पवारांपासून एकनाथ शिंदेंपर्यंत व मोदी-शहांपासून निवडणूक आयोगापर्यंत प्रत्येकाने धड घ्यावा असा हा निकाल. मोदी पुन्हा शपथ घेतील, पण त्यांना कुबडय़ा घेऊन राष्ट्रपती भवनात जावे लागेल. या नव्या रचनेत अमित शहांकडे गृहखाते राहील काय? याच गृहखात्याच्या गैरवापराने नरेंद्र मोदींचे नुकसान झाले व लोकांच्या दृष्टीने ते खलनायक ठरले. भविष्यात अमित शहांविरोधात पक्षातच आवाज उठेल असे चित्र आहे. बहुमत गेल्याने लोकांची भीती मेली आहे. बहुमत गमावलेल्या भाजपने मोदी यांना सहन करू नये, असा आवाज महाराष्ट्रातच उठण्याची शक्यता जास्त आहे. असे घडले तर महाभारताच्या चारित्र्याला पुन्हा उभारी येईल! असं सामनातून म्हंटल.