हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेनेतून बंड करून उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं आणि भाजपसोबत सत्तास्थापन केली, या घटनेला २ वर्षाहून अधिक काळ गेला, मात्र अजूनही शिवसैनिकांच्या मनातील जखम ताजी आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्याला या ४० गद्दारांचा सूड घ्यायचा आहे असं म्हणत थेट इशारा शिंदे गटाला दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत आज मराठवाडा दौऱ्यावर आहेत. यावेळी एका जाहीर सभेत बोलताना संजय राऊतांनी शिंदे गट आणि सत्ताधारी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली.
संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेला सुखाचे दिवस येतील. मग राज्यातील शेतकरी असतील, विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, निवृत्त सैनिक आणि महिला असतील, या सर्वांचा विचार करनारा नेता म्हणजे उद्धव ठाकरे आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना संपूर्ण देशात कोरोनाचे संकट थैमान घालत होते. मोदींच्या आणि योगींच्या राज्यात हजारो कोरोनाग्रस्त मृतदेह गंगेत फेकली जात होती. त्यावेळेला या महाराष्ट्रात आपला कुटुंबप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे महाराष्ट्राची काळजी घेत होते, त्यांनी आपल्याला आधार दिला. मात्र जेव्हा उद्धव ठाकरे आजारी पडले तेव्हा या ४० गद्दारांनी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून आपलं सरकार पाडलं. त्याचा बदला आणि सूड आपल्याला घ्यायचा आहे असं संजय राऊतांनी म्हंटल.
यावेळी संजय राऊत यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही निशाणा साधला. काही ठिकाणी प्रचंड महापूर येऊन गेला, लोकांची घरे आणि शेती पूर्णपणे वाहून गेली. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात येऊन गेलो, पण सरकार अजून शेतकऱ्यांच्या बांधावर गेलं नाही. या राज्याचे कृषिमंत्री याच मराठवाड्यातील आहेत. मात्र खाली चिखल आहे म्हणून पुरग्रस्तांची पाहणी करताना ते गाडीतुन खालीही उतरले नाहीत. आपल्या पायाला माती लागेल म्हणून जो कृषिमंत्री गाडीतून खाली उतरत नाही अशा लोकांचं राज्य आपल्याला घालवायचं आहे असं म्हणत संजय राऊतांनी सरकारवर घणाघात केला.