सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
सांगली लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी खासदार पाटील यांचा प्रमुख अर्ज दाखल करण्यात आला आहे.
अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात नेते, पक्ष कार्यकर्त्यांची मोठी गर्दी केली होती.
दरम्यान प्रारंभी आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर भाजपचे कार्यकर्ते जमा झाले. तेथून पावणेएक वाजता अर्ज भरण्यासाठी प्रमुख मंडळी जिल्हाधिकारी कार्यालयात आली. तत्पूर्वी उमेदवारी अर्जाची तपासणी प्रशासनाकडून करुन घेतली. दुपारी एक वाजता निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. चौधरी यांच्याकडे उमेदवार संजयकाका पाटील यांनी अर्ज दाखल केला. त्याच्यासोबत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, आ. सुधीर गाडगीळ, आ. अनिल बाबर उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, देशाचे कणखर नेतृत्व नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी सांगलीतून संजयकाका पाटील पुन्हा विजयी होतील. विरोधकांकडे उमेदवारच नसल्याने भाजपच्या विजयाबद्दल पक्षाला खात्री आहे.
अर्ज दाखल करण्यासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आ. सुरेख खाडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभूते, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, रमेश शेंडगे, माजी आमदार भगवानराव साळुंखे, शेखर इनामदार, मकरंद देशपांडे, प्रकाश बिरजे, दीपक शिंदे, अरविंद तांबवेकर, मुन्ना कुरणे, महिला आघाडीच्या नीता केळकर, बजरंग पाटील आदी उपस्थित होते.