सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे मंगळवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास अडीच दिवसांच्या मुक्कामासाठी लोणंदनगरीमध्ये आगमन झाले. लोणंद नगरपंचायत आणि लोणंदकरांच्यावतीने भक्तिमय वातावरणात पालखीचे स्वागत करण्यात आले. दरम्यान आज लोणंदच्या पालखी तळावर माऊलींची पालखी सजवलेल्या ओट्यावर ठेवण्यात आली असून भाविकांनी माऊलींच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने एकच गर्दी केली आहे.
लोणंदनगरीतील दोन मुक्कामानंतर उद्या गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास तरडगावकडे माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. तरडगावात सोहळा दाखल होण्याआधी पुरातन चांदोबाचा लिंब या ठिकाणी माऊलीच्या पालखी सोहळ्यातील अश्वांचे पाहिले उभे रिंगण पार पडणार आहे. डोळ्यांचे पारणे फेडणारा हा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक या ठिकाणी येत असतात.
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा म्हणजे लोणंदनगरीसाठी सर्वात मोठा उत्सव असतो. या सोहळ्याची प्रत्येकजण मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतो. दोन वर्षे कोरोनामुळे पालखी सोहळा रद्द झाला मात्र, यावेळी पालखी सोहळा दाखल झाला असल्याने भाविकांमध्ये उत्साह आहे. पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची संख्या दुपटीने वाढली आहे.




