सरसंघचालक उद्यापासून पाच दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर, 10 वर्षांनंतर प्रथमच मोठा दौरा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत उद्यापासून म्हणजेच 11 ते 15 नोव्हेंबरदरम्यान औरंगाबाद शहराच्या दौऱ्यावर येणार आहेत. यापूर्वी 2011 मध्ये सरसंघचालकांनी औरंगाबादमध्ये तीन दिवसांचा मुक्काम केला होता. त्यानंतर पहिल्यांदाच ते 5 दिवसांच्या मुक्कामासाठी शहरात येत आहेत. त्यामुळे स्वयंसेवकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आगामी काळात संघटनात्मक कार्यासंबंधीची बैठकांचे आयोजन या काळात केले जाईल.

सरसंघचालक मोहन भागवत 11 नोव्हेंबर रोजी हिंगोली जिल्ह्यातील नर्सी येथील श्री संत नामदेव महाराजांचे व गुरुद्वाराचे दर्शन घेऊन संध्याकाळी औरंगाबादेत येतील. याच दिवशी संघाच्या नगर स्तरावरील कार्यकर्त्यांचा सहकुटुंब एकत्रिकीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात सरसंघचालक मोहन भागवत हे पर्यावरण, सामाजिक समरसता आणि कुटुंब प्रबोधन या विषयांवर स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतील. पुढील मुक्कामात सरसंघचालक 12,13 आणि 14 रोजी संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यासाठी विविध बैठका घेतली. पहिल्या दोन दिवसात प्रामुख्याने औरंगाबादमधील पूर्णवेळ कार्य करणाऱ्या प्रचारकांच्या आणि प्रांत कार्यकारिणी मंडळाच्या बैठका आणि काही स्वयंसेवकांच्या भेटी घेणार आहेत. 14 नोव्हेंबर रोजी संघाच्या विविध संस्था, संघटनांची समन्वय बैठक होईल. यात सरसंघचालक कार्यकर्त्यांशी विविध विषयांवर चर्चा आणि मार्गदर्शन करतील. 15 नोव्हेंबर रोजी ते विमानाने हैदराबाद मार्गे कोलकत्याला रवाना होतील.

सरसंघचालकांच्या पाच दिवसीय दौऱ्यातील सर्व महत्त्वाचे कार्यक्रम सिडकोतील अग्रसेन भवन येथे आयोजित करण्यात आले आहे. आयोजन स्थळी केवळ निमंत्रितांनाच प्रवेश असेल. कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाईल, अशी माहिती देवगिरी प्रांताचे संघचालक अनिल भालेराव आणि देवगिरी प्रांत कार्यवाह हरीश कुलकर्णी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी देवगिरी प्रांत कार्यकारिणी सदस्य अॅड. आशिश जाधवर, विश्व संवाद केंद्र संयोजक ओंकार शेलदरकर, शहर प्रचारप्रमुख चेतन पगारे यांची उपस्थिती होती.

Leave a Comment