अजब शक्कल : रिमोट कंट्रोलने 27 लाख 57 हजारांची वीजचोरी, दोघांवर गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | वीज मीटरला रिमोटच्या सहाय्याने कंट्रोल करून वीज मीटरवर वीज वापराची नोंद होणार नाही, अशी तजवीज करून गत वर्षभरात 2 लाख 40 हजार 305 युनिटचे 27 लाख 57 हजार 400 रुपयांची वीज चोरी केली. याप्रकरणी दोघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वीज वितरण कंपनीच्या भरारी पथकाने गोटे तालुका कराड येथील पी. बी. पॉलीमर्सवर ही कारवाई केली. रज्जाक बाबालाल पटेल व खालिद रज्जाक पटेल अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद अतिरिक्त कार्यकारी अभियंता उज्वला मोहन लोखंडे यांनी शहर पोलिसात दिली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, वीज ग्राहकांच्या वीज मीटरची व जोडभाराची तपासणी करणे, वीज चोरी करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेणे, वीज चोरी करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी उज्वला लोखंडे यांच्यासह आशिष अर्जुन जगधने, किरण प्रकाश देवकर, प्रवीण बी. सरवदे यांच्यासस भरारी पथकाची नेमणूक केली आहे. त्यानुसार 27 जानेवारी 2022 रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास भरारी पथकाने गोटे येथील रज्जाक पटेल यांच्या औद्योगिक दराच्या वीज कनेक्शनची तपासणी केली असता. वीज वापर व त्यांना आलेल्या बिलामध्ये तफावत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पी. बी. पॉलिमरचे रज्जाक पटेल यांना मीटरची जागा दाखवण्यास व वीज बिलाची प्रत मिळण्याची विनंती केली. त्यानुसार भरारी पथकाने वीज मीटर पाहिले असता ते पी. बी. पॉलीमर्ससाठी वीज वापर करत असल्याचे लक्षात आले. वीज मीटर व त्यावरील विजेचा वापर पाहिला असता भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी वीज मीटरवरील झाकण व वीज मीटर बारकाईने पाहिले असता वीज मीटरला बारीक छिद्र पाडून त्याच्या साह्याने मीटरमध्ये एका बाजूला छोटे किट बसविण्यात आले होते. त्याच्या साह्याने विजेचा वापर कंट्रोल केला जात होता. त्या किटला रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने नियंत्रणात ठेवले जात होते. याबाबतची खात्री पटल्यानंतर भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित वीज मीटर सील करून जप्त केले.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या मीटरची चाचणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेतली असता. किट बसवल्यामुळे मीटर हळू फिरत असल्याचे दिसून आले. त्यामुळे वीज चोरी झाल्याचे लक्षात आले. गत वर्षभरापासून ही वीजचोरी होत असल्याचे निदर्शनास आल्याने 2 लाख 40 हजार 305 युनिटचे 27 लाख 57 हजार 400 रुपयांची वीज चोरीचे बिल रज्जाक पटेल यांना दिले. परंतु पटेल यांनी वीज चोरी झालेल्या बिलाची रक्कम कंपनीकडे भरली नसल्याने संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वीज चोरीसाठी वापरलेले साहित्य मीटर, किट, रिमोट आदी जप्त केले आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरुटे करत आहेत.

Leave a Comment