सातारा प्रतिनिधी शुभम बोडके
सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्वी बालेकिल्ला होता. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. माढ्या लोकसभा मतदार संघातही असेच बोलले जायचे पण त्याठिकाणी निवडणूकीत भाजपाचा उमेदवार निवडून आला. सातारा जिल्ह्यात शरद पवार यांचे फक्त तीनच आमदार राहिले आहेत. त्यांचाही पराभव होणार असून यावेळी नक्की बदल दिसेल, असे भाजप जिल्हाध्यक्ष व माण- खटावचे आ. जयकुमार गोरे यांनी स्पष्टपणे सांगितले.
लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागलेल्या 144 लोकसभा मतदारसंघांची निवड केली असून त्यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघातील तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय उद्योग व वाणिज्य राज्यमंत्री सोमप्रकाश हे दि. 28 पासून तीन दिवसांच्या जिल्हा दौर्यावर आहेत. केंद्रीय योजनांची अंमलबजावणी, पक्षाचे संघटनात्मक काम, बुथ कमिट्या, लोकप्रतिनिधींची सक्रियता आदिंची माहिती मंत्री सोमप्रकाश घेणार आहेत. भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आ. जयकुमार गोरे म्हणाले, सातारा लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री सोमप्रकाश तीन दिवसांसाठी येत आहेत. दर तीन महिन्यांनी केंद्रीय मंत्री मतदासंघाचा दौरा करणार आहेत. केंद्रात आणि राज्यात एकाच विचाराचे सरकार असल्यामुळे आगामी बांधणीसाठी त्याचा फायदा होणार आहे. केंद्रीय मंत्री सोमप्रकाश यांचे दि. 28 रोजी सकाळी 9 वाजता शिरवळ येथे स्वागत होईल. त्यानंतर वाई येथे महागणपती मंदिरात कृष्णा नदीकाठावर कृष्णाई आरती होईल. त्यानंतर पदाधिकार्यांशी ते चर्चा करणार आहेत. पाचवड येथे सरपंचांची भेट घेवून बुथ रचनेची माहिती घेणार आहेत. तेथून लिंब (ता. सातारा) येथे बुथ अध्यक्षाची भेट घेवून तयारीची माहिती घेणार आहेत. मंत्री सोमप्रकाश हे सातार्यात भाजप कोअर कमिटी, भाजप जिल्हा कार्यकारिणी व सर्व आघाड्यासोबत त्यांची बैठक होणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषद सभागृहात सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांसोबत आयोजित मेळाव्यास ते उपस्थित राहणार आहेत.
आ. जयकुमार गोरे म्हणाले, दि. 29 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत केंद्र सरकारकडून राबवल्या जाणार्या योजनांची माहिती घेतील. तेथेच पत्रकारांशी संवाद साधतील. त्यानंतर रहिमतपूर (ता. कोरेगाव) येथे जिल्ह्यातील भाजपचे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामपंचायत सदस्यांच्या मेळाव्यास मंत्री सोमप्रकाश उपस्थित राहणार आहेत. पुढे ते, उंब्रज, आटके, सुपने (ता. कराड) येथे जातील. दि. 30 रोजी सकाळी मलकापूर ते हुतात्मा स्मारक अशी रॅली काढण्यात येणार आहेत. त्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. अतुल भोसले, माजी आमदार मदनदादा भोसले, विक्रम पावस्कर, धैर्यशील कदम, सुरभी भोसले, अनुप सूर्यवंशी, अॅड. प्रशांत खामकर, विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार आदि पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते