सातारा गुन्हे शाखेची कारवाई ः दुचाकी व रेशनिंगचा तांदूळ चोरीप्रकरणी कराडच्या तिघांना व पाटणच्या एकाला अटक

Crime
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | दुचाकी चोरणाऱ्या कराड तालुक्यातील टोळीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेली आहे. याचबरोबर रेशनिंग दुकान फोडत तांदळाची पोती चोरणाऱ्यांनाही स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. यावेळी चोरट्यांकडून सव्वादोन लाख रुपये किमतीच्या ९ दुचाक्या जप्त करण्यात आल्या असून, याबाबतचे ९ गुन्हे विविध पोलिस ठाण्यात दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जीवन ऊर्फ प्राण नामदेव कांबळे (वय २८) व अविनाश आनंदा माने (वय २४, दोघेही रा. कालगाव, ता. कराड), ऋषीकेश अविनाश सावंत (वय २०, रा बुधवार पेठ, कराड)  अशी दुचाकी चोरीप्रकरणी, तर रेशनिंग दुकान फोडल्याप्रकरणी संजय राजाराम धुमाळ (वय ३१) रा. तासवडे, ता. कराड) व पंकज सुनील पाटील (वय २१, रा. माजगाव, ता.पाटण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे हे (ता. १३) रोजी उंब्रज परिसरात गस्तीवर होते. या वेळी त्यांना चोरांची माहिती मिळाली. यानुसार शोध घेत त्यांनी प्राण कांबळे, अविनाश माने, ऋषीकेश माने या तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी कोपर्डे हवेली येथे दुचाकी चोरल्याचे सांगितले. अटक केल्यानंतर त्यांनी चौकशीत कराड शहर पोलिस ठाणे हद्दीतून ५ मोटारसायकली, कराड तालुका पोलिस ठाण्यात १ मोटारसायकल, कडेगाव पोलिस ठाणे व तासगाव पोलिस ठाणे, कामोठे पोलिस ठाणे, नवी मुंबई पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ९ दुचाक्या चोरल्याची कबुली दिली. यानुसार त्या दुचाक्या पोलिसांनी जप्त केल्या. याचदरम्यान त्यांनी नुने (ता.पाटण) येथील रेशनिंग दुकान फोडत तांदळाची पोती चोरणाऱ्या संजय धुमाळ आणि पंकज पाटील यांना अटक करत मुद्देमाल जप्त केला.