सातारा | जिल्हा बॅंक अग्रगण्य बॅंक आहे. कोरोनामुळे सुनिल माने आणि मला एक वर्ष जास्त काम करण्यास मिळाली. आम्ही पाच वर्षे दोघांनी एकत्र बॅंकेत काम केले आहे. आता जिल्हाध्यक्ष माने यावेळी निवडणुकीत नाहीत, मात्र पालकमंत्र्यांनी त्यांचा विचार करून त्यांना स्विकृत संचालक म्हणून योग्यवेळी सामावून घ्यावे अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली.
कराड येथे सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सहकार पॅनेलच्या आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन मदनराव मोहिते, प्रदीप विधाते, सत्यजित पाटणकर, अर्बन कूटूंब प्रमुख सुभाषराव जोशी, ज्येष्ठ नेते भिमरावदादा पाटील, सभापती प्रणव ताटे, देवराज पाटील, राजेश पाटील, सुनिल माने, सुनिल पाटील, कांचनताई साळुंखे, दत्तानाना धूमाळ, राजेंद्र राजपूरे, दयानंद पाटील, अनिल देसाई, जगदीश जगताप, जयंतकाका पाटील आदी मेळाव्याला उपस्थित होते.
कोरेगाव सोसायटी गटात काटे की टक्कर
कोरेगाव तालुक्यात सध्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. सहकार पॅनेलमधून सोसायटी मतदारसंघासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव महाडिक व आमदार महेश शिंदे यांच्या गटाच्या सुनील खत्री यांच्यात चुरशीची लढत होत आहे. आ. महेश शिंदे आणि आ. शशिकांत शिंदे यांचे कार्यकर्ते विजय आपलाच होणार असा दावा करत आहे. त्यामुळे अखेरच्या क्षणापर्यंत ही निवडणूक चुरशीची होणार असे दिसते.
त्यातच राष्ट्रवादीने बॅंकेचे उपाध्यक्ष सुनील माने यांचा पत्ता कट करून शिवाजीराव महाडिक यांना मैदानात उतरविले आहे. सुनिल माने यांची उमेदवारी कापण्यात आल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह कोरेगाव सोसायटींच्या मतदारांतही नाराजी आहे. या नाराजीचा फटकाही राष्ट्रवादीच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता लक्षात घेवून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कराड येथील मेळाव्यात सुनिल माने यांना स्विकृत संचालक पदी घेण्याची मागणी केली असल्याचे दिसून येते.