सातारा जिल्हा बॅंक निवडणूक : सोसायटी गटातील जिरवाजिरवीच्या राजकारणात राष्ट्रवादी बॅंकफूटवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील

सातारा जिल्ह्यात जिल्हा बॅंकेत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे संचालक जास्त निवडूण गेले आहेत. तरीसुध्दा जिरवाजिरवीच्या राजकारणात राष्ट्रवादी बॅंकफूटवर काही प्रमाणात गेलेली आहे. सध्या पक्षनिहास बलाबल पाहिल्यास राष्ट्रवादी पक्ष- 15 भाजप- 3, शिवसेना- 2, एक बंडखोर राष्ट्रवादी- 1 असे दिसत आहे. जिल्ह्यात ज्या ठिकाणी सोसायटी गटातील लढती झाल्या त्यामध्ये केवळ 1 ठिकाणीच पाटण येथील जागा राष्ट्रवादी पक्षाने स्वताः च्या ताकदीवर जिंकली आहे.

सातारा जिल्हा बॅंकेत सोसायटी गटात 11 सोसायटी गटातील 5 जागा बिनविरोध झालेल्या होत्या. त्यामध्ये सहकार पॅनेलचे सातारा गटातून आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले (भाजप), वाई गटातून नितीन पाटील (राष्ट्रवादी), महाबळेश्वर गटातून राजेंद्र राजपुरे (राष्ट्रवादी), खंडाळा गटातून दत्तानाना ढमाळ (राष्ट्रवादी), फलटण गटातून शिवरूपराजे खर्डेकर (राष्ट्रवादी) यांचा समावेश आहे. तर कराड, पाटण, जावली, माण, खटाव आणि कोरेगाव सोसायटी गटाची निवडणूक झाली.

कराडला ताकद वाढणार

जिल्हा बॅंकेत कराड सोसायटी गटात सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी भाजपचे डाॅ. अतुल भोसले यांची मदत घेवून विरोधी उमेदवार अॅड. उदयसिंह पाटील यांचा पराभव केला. उदयसिंह पाटील यांच्या पराभवाने सोसायटी गटात सत्तांतर म्हणावे लागले, कारण 54 वर्षे हा सोसायटी गट काॅंग्रेसचे कै. विलासराव पाटील यांच्याकडे होता. त्यामुळे काही प्रमाणात राष्ट्रवादीची सोसायटी गटातील ताकद वाढलेली असल्याचे दिसून येत आहे. तर भविष्यात राष्ट्रवादी पक्ष आपली स्वतःची ताकद वाढविण्यासाठी आता प्रयत्न करणार हे नक्की. जिल्ह्यातील सहा जागांपैकी 4 ठिकाणी सहकार पॅनेल उमेदवारांचा पराभव झालेला आहे. पराभूत उमेदवार हे सर्वच्या सर्व राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पदाधिकारी होते. त्यामुळे भाजपशी हातमिळवणी करून जिरवाजिरवीच्या राजकारणात राष्ट्रवादी बॅंकफूटला गेलेली पहायला मिळत आहे.

जावळीत ताकद वाढली? कोरेगाव चिठ्ठीवर का?

सातारा जिल्हा बॅंकेच्या सोसायटी गटात राष्ट्रवादीचे पराभूत झालेले 4 उमेदवार आहेत. यामध्ये प्रामुख्याने राज्यात व राजकीय क्षेत्रात लक्षवेधी पराभव हा राष्ट्रवादीचे आ. शशिकांत शिंदे यांचा झालेला आहे. आ. शिंदे याच्या विरोधातील राष्ट्रवादीचे बंडखोर आणि भाजपचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे विश्वासू ज्ञानदेव रांजणे यांनी 1 मताने केला आहे. या जागेवर राष्ट्रवादीचेच नुकसान झाले असून भविष्यात राष्ट्रवादी चिन्ह म्हणून मदतीवेळी ज्ञानदेव रांजणे कोणाची बाजू घेणार हे आता राजकीय मंडळींना वेगळे सांगण्याची गरज नाही. एकमेकांच्या जिरवाजिरवीत कोरेगाव सोसायटी गटात शिवसेनेचे महेश शिंदे यांचे सहकारी सुनील खत्री यांनी चिठ्ठीच्याद्वारे विजय मिळवला. कोरेगाव मतदार संघात सहकार क्षेत्रात राष्ट्रवादीचे वर्चस्व असताना हा निकाल समसमान मतांवर येतो, म्हणजे राष्ट्रवादी पक्षाची ताकद कशी, कोठे कमी पडली यांचा शोध घ्यावा लागणार आहे.

माण- खटाव विश्लेषण

माण आणि खटाव या दोन्ही सोसायटी गटात राष्ट्रवादी पक्षाला विचार करण्यास भाग पाडणारा निकाल लागला आहे. माण सोसायटी गटातून शिवसेनेचे शेखर गोरे यांना राष्ट्रवादी पक्षासह भाजपचेही आवाहन होते. तरीही चिठ्ठीद्वारे शेखर गोरे यांनी बॅंकेत संचालकपदी विजय मिळवला. भाजपची साथ असताना राष्ट्रवादी पक्ष मागे पडतो म्हणजे नक्की जिरवाजिरवी किती झाली असेल. खटाव तालुक्यात राष्ट्रवादीचे माजी आमदार ज्यांनी तुरूंगातून निवडणूक लढविली अशा प्रभाकर घार्गेंनी विजय मिळवला. येथे काॅंग्रेसचे रणजिंतसिह देशमुख आणि भाजपचे डाॅ. दिलीप येळगावकर यांनी पुढाकार घेताला होता. प्रभाकर घार्गे यांच्या पत्नी आणि दोन्ही मुलींनी वडिलांना उमेदवारी नाकारल्याने अन्याय झाला असून त्या विरोधात जोरदार मोर्चेबांधणी करत विजय मिळवला. अशातच नंदकुमार मोरेंना पराभव पत्कारावा लागला. त्यामुळे यापुढे माण- खटावमध्ये पुन्हा राष्ट्रवादी बॅंकफूटवर असल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रवादीचा एकमेव एक्का “सत्यजितसिंह पाटणकर”

सातारा जिल्हा बॅंकेत सोसायटी गटात 6 ठिकाणी लढती झाल्या. त्यामध्ये सत्ताधारी सहकार पॅनेलचा 4 ठिकाणी पराभव झाला, तर केवळ 2 ठिकाणी विजय मिळाला. जिल्ह्यात राष्ट्रवादी काॅंग्रेसने ज्या लढती झाल्या त्या ठिकाणी इतर पक्षाशी हातमिळवणी केल्याचे दिसून येते. परंतु राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पाटण सोसायटी गटात सत्यजितसिंह पाटणकर यांचा विजय हा केवळ राष्ट्रवादीच्या ताकदीवरच मिळालेला दिसतो. पाटण तालुक्यात सहकार सोसायट्यावर निर्विवाद आजतरी पाटणकर गटाचे वर्चस्व असल्याचे दिसून आले.