सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ९ हजार पार गेली असून कोरोना विषाणुने आता राज्यातील ग्रामिण भागांतही पाय पसरायला सुरवात केली आहे. सातारा जिल्हा रुग्णालयातील एका महिला कर्मचार्याला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून यामुळे आता जिल्ह्यातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या ४२ वर पोहोचली आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांनी दिली आहे.
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे एक कोरोना बाधित रुग्ण सापडला असून सदर रुग्ण जिल्हा रुग्णालयातील महिला कर्मचारी असल्याची माहिती आहे. यामुळे आता सातारा शहरातही कोरोनाचा शिरकाव झाला असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, मंगळवारी कराड तालुक्यात पाच आणि फलटण येथे एक कोरोना बाधित रुग्ण सापडले होते. जिल्ह्यातील कराड, जावळी, पाटण हे भाग मागील काही दिवसांपासून खबरदारी म्हणुन संपुर्ण सील करण्यात आले आहेत. तसेच रविवारी कराड येथे एका परिचारिकेचा मेदूला आॅक्सिजनचा पुरवठा कमी झाल्याने मृत्यू झाला होता. आता जिल्हा रुग्णालयातील महिला कर्मचारीच कोरोना पोझिटिव्ह आढळल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.