सातारा प्रतिनिधी : शुभम बोडके
वाढत्या कोरोनामुळे राज्य शासनाने चारचाकी वाहनातून प्रवास करण्यावर प्रवाशांना काहीसे निर्बंध घातलेले आहेत. मात्र त्याचे प्रवाशांकडून वारंवार उल्लंघन होत असल्याचा प्रकार सातारा शहरात घडत आहे. एकीकडे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे विनाकारण बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार सातारा शहरात बुधवारी तब्बल ९७० जणांचे अहवाल हे कोरोना पॉझिटिव्ह आल्याने पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. वाढणारी रुग्णसंख्या अधिक डोकेदुखी बनू नये म्हणून बुधवारी सकाळी सातारा शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांच्यावतीने विनाकारण वाहनांतून फिरणाऱ्या वाहनधारकांवर कारवाईची मोहीम राबविण्यात आली.
बुधवारी सकाळी शहरात मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडल्याने सुरक्षेच्या अनुषंगाने सातारा शहर पोलिसांच्यावतीने दुचाकी, चारचाकी वाहनधारकांवर कारवाईची मोहीम सुरु करण्यात आली. यामध्ये अनेक दुचाकी वाहनधारकांवर कारवाई करीत त्यांची वाहने जप्त करण्यात आली. तर शासनाने निश्चित करून दिलेल्या प्रवाशाच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेतल्याप्रकरणी चारचाकी वाहनधारकांवरही कारवाईचा दंडुका उभारण्यात आला.
सातारा शहरात वाढत असलेली प्रवाशांची संख्या पाहता मोठ्या प्रमाणावर पोलीस प्रशासन रस्त्यावर उतरले आहे. पोलिसांच्या सोबतीला राज्य राखीव पोलीस दल, पोलीस कर्मचारी तसेच वाहतूक शाखेतील पोलीस यांचाही शभंग आहे. मोठ्या प्रमाणावर पोलिसांकडून कारवाई केली जात असल्याने प्रवाशांनीही एकच धांदल उडत आहे. कारवाईवेळी नागरिक व पोलिसांमध्ये वादावादीचेही प्रकार घडत आहे. वाहनधारकांवर कारवाई करीत त्यांना दण्डच्या पणत्याही पोलिसांकडून दिल्या जात आहेत. तसेच विनाकारण बाहेर पडू नका, असे आव्हान पोलिसांकडून नागरिकांना केले जात आहे.