सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने नुकतीच एक मोठी कारवाई करण्यात आली असून बेकायदेशीर गावठी पिस्टल बाळगणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तीन गावठी पिस्टल आणि तीन जिवंत राऊड असा 2 लाख 5 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी अमित हनुमंत कदम (रा. कुंभारवाडा,अंतवडी ता. कराड), प्रसाद प्रकाश वाघ (रा. विद्यानगर, ता. कराड) व धीरज उर्फ काण्या बाळासाहेब भोसले (रा. मसूर) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई कराड तालुका परिसरात करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार अमित कदम यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल असून तो अतवडी फाटा येथे उभा आहे, अशी माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर आणि त्यांच्या पथकाने तात्काळ अंतवडी फाटा येथे जाऊन कदम याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्टलसह तीन जिवंत राऊड आणि एक मोबाईल हँडसेट असा सुमारे 75 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
कदम याच्यावर यापूर्वीही बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याचा गुन्हा नोंद आहे त्याची सखोल चौकशी केली असता त्याने आणखी दोन पिस्टल विक्री करता आणले असून ते पिस्टल प्रसाद वाघ आणि धीरज उर्फ काण्या बाळासाहेब भोसले यांच्याकडे आहेत आणि ते दोघे उंब्रज रोडवरील हॉटेल सिद्धार्थ जवळ उभे आहेत असे सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या दोघांनाही तातडीने ताब्यात घेतले. त्यांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल, एक मोबाईल असा 1 लाख 30 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे.