हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा लोकसभा निवडणुकीसाठी (Satara Lok Sabha 2024) शरद पवार गटाकडून अखेर उमेदवाराच नाव जाहीर करण्यात आलं आहे. शरद पवारांचे कट्टर समर्थक आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde Satara Lok Sabha Candidate) यांना तिकीट जाहीर करण्यात आलं आहे. तर रावेर लोकसभा मतदार संघातून श्रीराम पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. आता फक्त माढा मतदारसंघात कोणाला तिकीट मिळते ते पाहायला हवं.
सातारा लोकसभेसाठी शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून उमेदवार कोण असेल याबाबत गेल्या काही दिवसांपासून तर्क वितर्क लावले जात होते. सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. याठिकाणी सध्या श्रीनिवास पाटील हे विद्यमान खासदार आहेत. मात्र तब्बेतीच्या कारणास्तव श्रीनिवास पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. त्यामुळे साताऱ्यात शरद पवार कोणाला तिकीट देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष्य लागलं होते. बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, सारंग पाटील असे काही पर्याय शरद पवारांसमोर होते. अखेर त्यांनी शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.
तुतारीच्या साथीने महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत अधिक बुलंद करण्यासाठी 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार' पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळाने लोकसभा निवडणूक २०२४ ची तिसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. चला, आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सोबतीने सेवा-सन्मान आणि… pic.twitter.com/XUHuXOh88P
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) April 10, 2024
कोण आहेत शशिकांत शिंदे –
शशिकांत शिंदे हे शरद पवार यांचे एकनिष्ठ आणि कट्टर समर्थक मानले जातात. ते कोरेगाव मतदारसंघाचे माजी आमदार राहिले असून पृथ्वीराज चव्हाण सरकार मध्ये त्यांनी मंत्रीपदही भूषवलं आहे. २०१९ च्या लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांचा प्रभाव करण्यासाठी शशिकांत शिंदे यांनी त्यावेळी जोरदार प्रचार केला होता आणि श्रीनिवास पाटील यांच्या विजयात मोलाची साथ दिली होती. आता पुन्हा एकदा भाजपकडून उदयनराजे भोसले याना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. असं झाल्यास सातारा लोकसभा मतदारसंघात शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे भोसले असा हायव्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे.