सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा- लोणंद मार्गावरती वासोळे गावच्या हद्दीत आज गुरूवारी सकाळी झाड पडले आहे. रस्त्यावर चालत्या दुचाकीवर झाड पडले असून दुचाकीचालक थोडक्यात बचावला आहे. तसेच या घटनेमुळे सातारा- लोणंद, फलटण मार्ग वाहतुकीस बंद झाला आहे.
घटनास्थळवरून मिळालेली माहिती अशी, गुरूवारी आज सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास सातारा- लोणंद मार्गावर पाटखळ माथा येथे भलेमोठे झाड कोसळले. सातारा तालुक्यातील वासोळे गावच्या हद्दीत कॅनॉल जवळ ही घटना घडली आहे. चालत्या दुचाकीवर झाड कोसळल्याने पाठीमागून येणाऱ्या वाहन चालकांच्यात मोठी धावपळ उडाली.
सातारा – लोणंद मार्गावर पडलेल्या या झाडामुळे साताऱ्यातून बारामती, फलटण, लोणंद आणि कोरेगाव तालुक्यातील सातारारोड येथे जाणारी वाहतूक बंद झाली आहे. या मार्गावरील वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. झाड मोठे असल्याने दुपारपर्यंत वाहतूक बंद राहण्याची शक्यता आहे. सततच्या पावसामुळे जुने झाडं कोसळले आहे.