सातारा प्रतिनिधी । वैभव बोडके
सातारा कृषी उत्पन्न बाजार समिती मतदानावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले गटाचे कार्यकर्ते आणि खासदार उदयनराजे भोसले गटाने पाठिंबा दिलेल्या स्वाभिमानी शेतकरी पॅनलचे कार्यकर्ते यांच्यामध्ये तू तू – मैं मैं झाल्याचे पहायला मिळालं. बाजार समिती मध्ये काम करत असणारे २ कर्मचारी विरोधी पॅनल साठी काम करत असल्याचा आरोप उदयनराजे भोसले गटाने केला आहे. तसेच सदर कर्मचाऱ्यांवर हक्कभंगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणीही करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणाने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
याबाबत अधिक माहिती अशी की, बाजार समितीमध्ये काम करणारे मोरे आणि घाडगे नावाचे दोन कर्मचारी हे विरोधी पॅनलचे प्रचार करत आहेत आणि उमेदवारांना फुस लावून दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप उदयनराजे भोसले गटाने केला. सकाळी 7 वाजल्यापासून बुथवर उभा राहून मतदारांना फूस लावण्यात आणि भडकवण्यात येत आहे. निवडणूक केंद्राने यांना कोणती ऑर्डर दिली आहे? असं म्हणत या दोन्ही कर्मचाऱ्यांवर कायद्याच्या चौकटीनुसार कारवाई झाली पाहिजे अशी मागणी उदयनराजे भोसले गटाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
जे जे कर्मचारी विशिष्ट पक्षाचा प्रचार करत आहेत त्यांनी आपल्या कर्मचारी सेवक पदाचा राजीनामा द्यावा आणि त्यानंतर त्यांनी ओपन मध्ये प्रचार कराव, आम्ही त्यांचे लोकशाही पद्धतीने स्वागत करू परंतु त्याआधी या सर्व कर्मचाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी उदयनराजे भोसले गटाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणानंतर मतदान केंद्रावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना आणि उमेदवारांना मतदान केंद्रापासून बाहेर जाण्यास सांगितले.