पाटण । इंटरनेटवरून पैशांची फसवणूक होण्याचे प्रकार अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. शहरी भागात सायबर क्राईमचे गुन्हे हे नित्याचेच असताना आता ग्रामीण भागही याचा शिकार होत आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एका महाविद्यालयीन तरुणीचा मोबाईल हॅक करून Phone pay वरून तब्बल 3 लाख 70 हजार रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे.
मल्हारपेठ भागातील (ता. पाटण) येथील महाविद्यालयीन युवतीचा मोबाईल ‘हॅक’ करुन तीच्या गुगल पे व फोन पे वरुन बँक खात्यातील तब्बल 3 लाख 70 हजार रुपये अज्ञाताने काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत संबंधित युवतीच्या फिर्यादीवरून मल्हारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मल्हारपेठ विभागातील एका गावात राहणारी युवती महाविद्यालयीन शिक्षण घेते. तीचे स्टेट बँकेच्या पाटण शाखेत बचत खाते आहे. तसेच पोस्ट पेमेंट बँक खातेही आहे. संबंधित दोन्ही खात्यावर तीने रक्कम ठेवली होती. तसेच मोबाईलमध्ये तीने दोन सिमकार्ड क्रमांकांवर गुगल आणि फोन पे सुरू करुन त्याद्वारे ती गरजेनुसार आॅनलाईन व्यवहार पे करायची.
दरम्यान, 27 मार्च ते 14 एप्रिल या कालावधीत त्या युवतीच्या मोबाईलचा अज्ञात व्यक्तीने ‘अॅक्सेस’ घेतला. दुसऱ्या डिव्हाईसवरून आरोपीने युवतीच्या मोबाईलचा ताबा घेत स्टेट बँक खात्यातील 2 लाख 80 हजार रुपये तसेच पोस्ट पेमेंट बँक खात्यातील 90 हजार रुपये असे एकुण 3 लाख 70 हजार रुपये काढून घेतले.
मोबाईलचा अॅक्सेस घेऊन ‘फोन पे’ व ‘गुगल पे’द्वारे करण्यात आलेला विभागातील हा पहिलाच गुन्हा असल्यामुळे पोलीसही चक्रावले आहेत. या गुन्ह्याची नोंद मल्हारपेठ पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलीस निरीक्षक विकास पाडळे तपास करीत आहेत.