कराड | शहरातील व्यापारी पेठेतून सुमारे सव्वा लाखाची कपडे खरेदी करुन दुकानदारांना आॅनलाईन पैसे पाठविल्याचे खोटे स्क्रिनशॉट दाखवत फसवणूक करणाऱ्यास पोलिसांनी अटक केले. कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली. शहेनशहा शरीफ शेख (रा. हैद्राबाद) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत कापड व्यापारी अभिषेक रमेश जैन यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात याबाबतची फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील शिवाजी क्लॉथ मार्केटमध्ये अभिषेक जैन यांचे कापड दुकान आहे. शहेनशहा शेख हा त्यांच्या दुकानात कपडे खरेदी करण्यासाठी आला होता. त्याने दोन तास दुकानात थांबून कपड्यांची निवड केली. दुकानातून त्याने 79 हजार रुपयांचे कपडे खरेदी केले. तसेच पैसे आॅनलाईन पाठविणार असल्याचे त्याने सांगीतले. अभिषेक जैन यांनीही त्यासाठी त्याला ‘क्युंआर कोड’ दिला. शहेनशहा शेख याने क्युंआर कोड स्कॅन करण्याचा बहाणा करीत पैसे पाठविल्याचा खोटा स्क्रिनशॉट अभिषेक जैन यांना दाखवला. मात्र, खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेज जैन यांच्या मोबाईलवर आला नाही. त्याबाबत जैन यांनी शहेनशहा याला विचारले असता, सर्व्हरला अडचण असेल, माझ्याकडून पैसे गेले आहेत, थोड्या वेळाने तुम्हाला मेसेज येईल, असे सांगून तो तेथून निघून गेला. मात्र, अभिषेक जैन यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत.
दरम्यान, शहरातील अन्य दोन कापड दुकानांमध्येही शहेनशहा याने असाच प्रकार केला. त्याने संबंधित दुकानांपैकी एका दुकानातून 39 हजार तर दुसऱ्या दुकानातून 7 हजार 500 रुपयांची कपडे खरेदी केली. पैसे पाठविल्याचा स्क्रिनशॉट दाखवला. मात्र, संबंधित दुकानदारांना पैसे मिळाले नाहीत. याबाबतची माहिती कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून शहेनशहा शेख याला ताब्यात घेऊन अटक केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर तपास करीत आहेत.